जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे बँकांना निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्स प्रतिनिधींचा आढावा
प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना
चंद्रपूर : डिसेंबर २०२५ अखेर संपलेल्या तिमाहीत जिल्ह्यातील बँकांनी केलेल्या प्रगतीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दि.25 ला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी बँकांना विविध शासकीय योजना आणि शेती कर्जाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन
राज्य सरकारने यावर्षी कर्जमाफीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, बँकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी तातडीने कर्जवाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विशेषतः मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला.
रोजगार योजनांत खाजगी बँकांचा सहभाग वाढवावा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खाजगी बँकांनी आपला सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध वित्तीय महामंडळांकडून बँकांकडे आलेली लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे विनाकारण अडवून न ठेवता, ती तातडीने निकाली काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली.
बँकिंग प्रगतीचा आढावा
बैठकीत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे यांनी डिसेंबर २०२५ पर्यंतच्या बँकिंग कामगिरीचे सादरीकरण केले. यामध्ये शासकीय योजनांची प्रगती, कर्जवाटपाची स्थिती आणि थकबाकी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक तृणाल फुलझेले, जिल्हा उद्योग केंद्राचे उपमहाव्यवस्थापक खरमाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


