खा. प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे आग्रही मागणी
‘पेन्च मॉडेल’ राबवण्याचे आवाहन
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल या संवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर (NH 930) वन्यजीवांचे वाढते अपघात रोखण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या महामार्गावर तातडीने ‘वन्यजीव ओव्हरपास’ मंजूर करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली.
वाहतुकीचा ताण आणि वन्यजीवांचा बळी
NH 930 या महामार्गावर कोळसा आणि सिमेंट वाहतुकीमुळे जड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. वाहनांच्या अतिवेगवान गतीमुळे वाघ, बिबट्या व अस्वल यांसारख्या दुर्मिळ वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. ही परिस्थिती केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर मानवी सुरक्षेसाठीही धोक्याची ठरत असल्याचे खासदार धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले.
‘पेन्च मॉडेल’चा दिला दाखला
नागपूर-पेन्च राष्ट्रीय महामार्गावरील (NH-7) आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वन्यजीव ओव्हरपासचा दाखला देत खासदार धानोरकर म्हणाल्या की, “विकास आणि पर्यावरण संरक्षण यांचा समन्वय साधणे ही काळाची गरज आहे. केवळ तात्पुरते उपाय या गंभीर समस्येवर तोडगा ठरू शकत नाहीत. त्यामुळे NH 930 वरील संवेदनशील पट्ट्यांमध्ये ‘पेन्च मॉडेल’च्या धर्तीवर कायमस्वरूपी ओव्हरपास निर्माण करावेत.”
निधी आणि समन्वयाची मागणी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळवण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने पर्यावरण व वन मंत्रालयाशी त्वरित समन्वय साधावा. तसेच, यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे केली. या अभियांत्रिकी उपाययोजनेमुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होईल आणि चंद्रपूरचा नैसर्गिक वारसा सुरक्षित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


