पोक्सो कायदा व बालविवाह प्रतिबंधाबाबत बीजीएम कार्मेल अकादमीमध्ये मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
चंद्रपूर : बालके ही देशाची खरी संपत्ती असून त्यांचे संरक्षण करणे ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. याच उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने पोक्सो (POCSO) कायदा, बालविवाह प्रतिबंध आणि विभागाच्या विविध योजनांबाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात बीजीएम कार्मेल अकादमी येथे मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कायद्याचे पालन आणि संवेदनशीलतेची गरज
कार्यक्रमात बोलताना पुलकित सिंह यांनी बालकांच्या संरक्षणासाठी शासन आणि समाजाने अधिक संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी बालकांची सुरक्षितता सर्वोच्च असल्याचे सांगत, सर्वांनी कायद्यानुसार चोख अंमलबजावणी करून पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे सूचित केले. सुधीर इंगळे यांनी पोक्सो कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी स्पष्ट करून ग्राम/वॉर्ड बाल संरक्षण समितीच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
जिल्ह्याला ‘बालस्नेही’ बनविण्याचा निर्धार
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी प्रास्ताविकातून चंद्रपूर जिल्ह्याला ‘बालविवाह मुक्त’ आणि ‘बालस्नेही’ बनविण्याचा संकल्प मांडला. “बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
उपस्थिती आणि सहभाग
या कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बारसकर यांच्यासह शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी केले, तर आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी मानले.
. या उपक्रमासाठी सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन आणि रूद्या संस्थेच्या प्रतिनिधींनी मोलाची भूमिका बजावली.


