Home सामाजिक ईश्वरचिठ्ठीने मनस्वी गिर्हे यांची स्थायी समिती सभापतीपदी वर्णी

ईश्वरचिठ्ठीने मनस्वी गिर्हे यांची स्थायी समिती सभापतीपदी वर्णी

204

काँग्रेसच्या वसंता देशमुखांचा पराभव

भाजप-शिवसेना युतीची सरशी आणि तिन्ही पदे सत्ताधाऱ्यांकडेच

चंद्रपूर : महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनस्वी संदीप गिर्हे यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार वसंता देशमुख आणि गिर्हे यांच्यात समसमान मते पडल्याने अखेर ईश्वरचिठ्ठीद्वारे गिर्हे यांची निवड करण्यात आली. या विजयामुळे महापालिकेतील तिन्ही महत्त्वाची पदे आता सत्ताधारी युतीकडे कायम राहिली आहेत.

.      सोमवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. १६ सदस्य असलेल्या समितीमध्ये दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ८ मते मिळाली. पेच निर्माण झाल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली, ज्यात मनस्वी गिर्हे यांचे नाव निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

.      या निवडीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्रानंतर भाजपच्या सदस्यांनी गिर्हे यांना पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे सत्ताधाऱ्यांचे पारडे जड झाले. प्रथमच नगरसेविका बनलेल्या मनस्वी गिर्हे यांची सभापतीपदी निवड होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

राजकीय समीकरणे आणि देशमुखांचा संघर्ष
निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. जनविकास सेनेचे पप्पू देशमुख यांनी रस्ता दुभाजक आणि महापालिकेतील आजवरच्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यासच काँग्रेसच्या वसंता देशमुख यांना मतदान करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मध्यस्थी करून दोन्ही ‘देशमुखांमधील’ हा पेच सोडवला आणि युती भक्कम केली.

‘ईश्वरचिठ्ठी’ ठरली देशमुखांसाठी दुर्दैवी
चंद्रपूर महापालिकेच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे “दोन्ही देशमुखांच्या पाठीशी ईश्वर नाही”. याचे कारण असे की, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशा दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या निवडणुका ‘ईश्वरचिठ्ठी’वर अवलंबून होत्या. उपमहापौर पदासाठी जनविकास सेनेचे प्रदीप उर्फ पप्पू देशमुख रिंगणात होते, तर सभापती पदासाठी वसंता देशमुख उमेदवार होते.

.     दुर्दैवाने, दोन्ही वेळी नशिबाने देशमुखांना साथ दिली नाही. उपमहापौर पदाच्या चिठ्ठीत प्रशांत दानव यांचे नाव निघाले, तर सभापती पदासाठी मनस्वी गिर्हे यांचे नाव आले. सलग दोन महत्त्वाच्या पदांच्या शर्यतीत चिठ्ठीमुळे पराभव स्वीकारावा लागल्याने राजकीय वर्तुळात या योगायोगाची मोठी चर्चा होत आहे.

error: Content is protected !!