मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या दोन भव्य प्रकल्पांचे भूमिपूजन
केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती
तेलवासा परिसरात औद्योगिक क्रांतीची नांदी, हजारो तरुणांना मिळणार रोजगाराची संधी
भद्रावती : तालुक्याच्या औद्योगिक नकाशावर उद्याचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे. तालुक्यातील तेलवासा परिसरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दोन मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचे भूमिपूजन उद्या, शनिवार, १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कोळसा ते केमिकल: न्यू एरा क्लिनटेकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
तेलवासा येथे ‘न्यू एरा क्लिनटेक’ या कंपनीचा कोळसा गॅसिफिकेशन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पामध्ये कोळशापासून रासायनिक उत्पादने तयार केली जाणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोळशाचे मूल्यवर्धन करणे आणि त्याद्वारे औद्योगिक उत्पादन वाढविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कोळसा क्षेत्रातील वापराला एक नवी दिशा मिळणार आहे.
. “तेलवासा येथे साकारला जाणारा ग्रेटा एनर्जी लिमिटेड कंपनीचा विशाल ‘ग्रीनफिल्ड’ प्रकल्प हा या परिसरासाठी औद्योगिक क्रांतीची नांदी ठरणार आहे. या एकाच छताखाली विविध स्वरूपाचे उद्योग चालणार असून, प्रामुख्याने १२ लाख टीपीए (TPA) क्षमतेचा भव्य पेलेट प्लांट, आधुनिक कोळसा गॅसिफिकेशन आणि सल्फर रिकव्हरी युनिटचा समावेश असेल. तसेच, गॅसवर आधारित प्रगत डीआरआय प्लांट (स्पंज आयरन युनिट), बिलेट्स युनिट आणि रोलिंग मिलच्या माध्यमातून धातू उत्पादनात मोठी वाढ केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक उपक्रम राबवत या ठिकाणी दररोज १० हजार विटा तयार करण्याची क्षमता असलेले उत्पादन केंद्रही कार्यान्वित होणार आहे. या अष्टपैलू उत्पादन क्षमतेमुळे भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उलाढाल होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला एक नवी भरारी मिळणार आहे.”
स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मिळणार बळ
या दोन्ही मोठ्या प्रकल्पांसाठी मागील वर्षी पर्यावरणीय जनसुनावणीची प्रक्रिया स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली होती. या प्रकल्पांच्या उभारणीमुळे भद्रावती तालुक्यातील आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारपेठ आणि छोटे व्यावसायिक यांच्यासाठीही हे प्रकल्प संजीवनी ठरणार असून, भद्रावती तालुक्याचा कायापालट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
. उद्या होणाऱ्या या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण तालुक्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. हा सोहळा भद्रावतीच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


