युवासेनेचा आंदोलनाचा इशारा
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
२१८ कोटींच्या कामात कंत्राटदाराचा मनमानी कारभार
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली ‘अमृत योजना २’ सध्या आपल्या भोंगळ आणि नियमबाह्य कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करत, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
. शहरात २१८ कोटी रुपये खर्चून १६० किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता, जो आता संपला आहे. मात्र, या दोन वर्षांत केवळ ६० किलोमीटरचेच काम पूर्ण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे, कामात दिरंगाई केल्याबद्दल मनपाने लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला असला, तरी ही कारवाई अपुरी असल्याचे सहारे यांचे म्हणणे आहे. केवळ कंपनीवर दंड न आकारता, या नियमबाह्य कामाला अभय देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
. विक्रांत सहारे यांनी निवेदनात कामाच्या दर्जावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, खोलीत कपात : नियमानुसार पाईप टाकताना ३ फूट खड्डा खोदणे अनिवार्य असताना, प्रत्यक्षात केवळ दीड फुटावरच पाईपलाईन टाकली जात आहे, तुकड्यांचा वापर:सलग पाईप टाकण्याऐवजी तुकड्यांचा वापर केला जात असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणावर गळती होण्याची शक्यता आहे, अपूर्ण टाक्या:योजनेतील पाण्याच्या ८ टाक्यांचे काम अजूनही रखडलेले आहे, रस्त्यांची दुरवस्था:पाईपलाईनसाठी शहरातील नवीन रस्ते खोदण्यात आले, परंतु त्यांची डागडुजी न केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
. या गंभीर प्रकाराबाबत सहारे यांनी प्रशासनाला दोन वेळा स्मरणपत्रे दिली, तरीही मनपा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपाने या कामाची नियमित पाहणी का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई केली नाही, तर युवासेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


