Home चंद्रपुर जिल्हा विशेष कॅरम खेळायला गेलेल्या तरुणांवर बिअरच्या बाटल्या आणि काठीने प्राणघातक हल्ला

कॅरम खेळायला गेलेल्या तरुणांवर बिअरच्या बाटल्या आणि काठीने प्राणघातक हल्ला

429

जुन्या नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळील घटना

एक तरुण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी, आरोपी फरार

वरोरा : शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, जुन्या नगरपरिषदेच्या मागील कॉम्प्लेक्स जवळ  ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन तरुणांवर बिअरच्या बाटल्या आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

.     मिळालेल्या माहितीनुसार, महेश नारायण खामनकर आणि ओम अरविंद गहेनेवार हे दोघे परिसरातील एका दुकानावर कॅरम खेळण्यासाठी गेले होते. खेळ सुरू असतानाच अचानक काही अज्ञात इसमांनी तिथे येऊन या दोघांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बिअरच्या बाटल्या फोडून आणि काठीचा वापर करून त्यांच्या डोक्यावर जबर प्रहार केले.

.      या भीषण हल्ल्यात महेश नारायण खामनकर हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर ओम अरविंद गहेनेवार याच्याही डोक्याला इजा झाली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

.       काही दिवसांपूर्वीच रेती घाटावर झालेल्या हत्येची घटना ताजी असतानाच, भरवस्तीत अशा प्रकारे हल्ला झाल्याने वरोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. वरोरा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

error: Content is protected !!