Home सामाजिक चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा मिळणार

चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा मिळणार

227

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

मुख्यमंत्र्यांची तात्काळ दखल

१५ दिवसांत प्रस्तावाला मान्यता देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवांना निर्देश

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक व प्राचीन श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळाली आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली आहे. पुढील १५ दिवसांत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत.

.      चंद्रपूर शहराला सुमारे ८०० वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोंड राजवटीपासून भोसलेकालीन परंपरेपर्यंत या शहराने सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख जपली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रपूरच्या या वैभवाचा उल्लेख करत, श्री विठ्ठल मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असल्याचे अधोरेखित केले. माता महाकाली आणि श्री अंचलेश्वर यांच्यानंतर भगवान श्री विठ्ठल हे शहरवासीयांचे आराध्य दैवत असून, या मंदिराला अधिकृत दर्जा मिळाल्यास परिसराच्या विकासाला मोठी मदत होणार आहे.

.      या मंदिरात वर्षभर कीर्तन, भजन आणि विविध धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यास मंदिराच्या पायाभूत सोयीसुविधा आणि सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध होऊ शकणार आहे. आ. मुनगंटीवार यांच्या या पुढाकारामुळे चंद्रपूरकर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

.      चंद्रपूरच्या सांस्कृतिक जीवनात श्री विठ्ठल मंदिराचे स्थान अनन्यसाधारण आहे. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मंदिरातून निघणारी भव्य रथयात्रा संपूर्ण शहराचे आकर्षण असते. विठू नामाच्या गजरात निघणाऱ्या या सोहळ्यात हजारो भाविक, महिला मंडळे आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असून, दिवसेंदिवस भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

.      वाढती गर्दी लक्षात घेता उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सोयी-सुविधा पुरवताना अनेक मर्यादा येतात. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात या मुद्द्यांकडे विशेष लक्ष वेधले आहे. मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासन स्तरावरून आवश्यक आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होईल, ज्यामुळे भाविकांसाठी अधिक सक्षम सुविधा विकसित करता येतील.

.      विशेष म्हणजे, या देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठराव देखील आ. मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार आधीच पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तांत्रिक बाबी आणि लोकभावनेची दखल घेत १५ दिवसांत मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला नवी झळाळी मिळणार असून, शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!