Home सामाजिक नंदोरीतील जि.प. शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात

नंदोरीतील जि.प. शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात

241

चिमुकल्या व्यापाऱ्यांनी कमावला ५,३२० रुपयांचा निव्वळ नफा !

खाद्यपदार्थांच्या विक्रीतून गिरवले व्यवसायाचे धडे

नवीन शैक्षणिक धोरण २०२६ अंतर्गत भविष्यातील आव्हाने पेलण्यास विद्यार्थी सज्ज

चंद्रपूर : “विद्येअंगी व्हावा विनय, विद्या सर्वत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया” या वंदनीय राष्ट्रसंतांच्या ओळींना आदर्श मानून, भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी बु. येथे आज बुधवारला ‘बाल आनंद मेळाव्याचे’ दिमाखदार आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर प्रत्यक्ष व्यवहाराची ‘खरी कमाई’ कशी करावी, याचे उत्तम सादरीकरण केले.

उत्साही उद्घाटन आणि लोकसहभाग
सकाळी ८:३० वाजता मेळाव्याचे उद्घाटन ग्रामपंचायत नंदोरीचे प्रशासक मंगेश भोयर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम ढवस यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विजय सातपुते, पालक दानव, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्याच्या उद्घाटनाची फित कापताना मान्यवर व शिक्षक, शिक्षिका

खमंग मेजवानी आणि ग्राहकांची पसंती
विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध खाद्यपदार्थांची दालने थाटली होती. यामध्ये ढोकळा, लस्सी, पराठे, इडली-सांबार वडा, कचोरी, समोसा, झुनका-भाकर, उकळलेली बोरे, मसाला पापड आणि पपई वड्यांसारख्या अस्सल मराठमोळ्या पदार्थांचा समावेश होता. गावातील मान्यवर, महिला वर्ग, युवक आणि कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी या खमंग पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.

मिळाली ‘खरी कमाई’ : असा राहिला गणिताचा हिशोब
या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन. सर्व वर्गांच्या दालनांचा गोषवारा काढला असता, एकूण ३,६२० रुपये भांडवली गुंतवणूक करण्यात आली होती. दिवसभराच्या विक्रीतून ८,९४० रुपयांची उलाढाल झाली, ज्यातून विद्यार्थ्यांनी ५,३२० रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.

व्यावसायिक कौशल्यांचा विकास
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वस्तूचे वैशिष्ट्य सांगणे, ग्राहकांना आकर्षित करण्याचे कसब, मागणीनुसार पुरवठा आणि किमतीचा समतोल राखणे यांसारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करता आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२६ ला अभिप्रेत असलेले ‘भविष्यवेधी विद्यार्थी’ घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील समन्वयाचे कौशल्य यातून विकसित झाले.

पालकांमध्ये सकारात्मकता
“जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचे धनी होऊ शकतात,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. मुख्याध्यापक विजय सातपुते यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या मेळाव्याने विद्यार्थ्यांना भविष्यात स्वावलंबी जगण्याची नवी दिशा दिली आहे.

error: Content is protected !!