उपविभागीय अधिकारी संदीप भस्के
नंदोरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चा शुभारंभ
भद्रावती : शासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करून पारदर्शक कारभार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आता शासकीय विभाग स्वतः शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणार आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांनी केले. भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे योजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
. महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्रमांक १ ची सुरुवात शनिवारी ७ मार्च २०२६ रोजी भद्रावती तालुक्यातील मौजा नंदोरी येथे करण्यात आली. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाळे हे होते तर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुुख अतिथी म्हणून तहसीलदार राजेश भांडारकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, ग्रामपंचायत प्रशासक मंगेश भोयर, सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र जिवतोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, सहा. आयुक्त पशुसंवर्धन मेश्राम, गटशिक्षणाधिकारी डाॅ. प्रकाश महाकाळकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास ताजणे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी गेडाम, उपसरपंच लांबट, भानुदास ढवस व विविध विभागातील तालुका प्रमुख उपस्थितीत होते.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राजेश भांडारकर यांनी केले. यावेळी विविध विभागांच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
तालुक्यातील सहाही मंडळांत अभियान
शेतकरी व सामान्य जनतेला आपल्या कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागतात. ही कटकट थांबवून गावातच त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, अर्जांचा तात्काळ निपटारा करणे आणि तक्रारींचे निवारण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भद्रावती तालुक्यातील सहाही मंडळांमध्ये प्रत्येक शनिवारी मंडळ व तालुका स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप मस्के यांनी दिली.
. सदर शिबिरादरम्यान विविध विभागातील स्टाल लावुन विविध योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत नवीन लाभार्थी निवड आदेश, नवीन रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र तसेच विविध दाखले यांचे वितरण करण्यात आले. तसेच वर्ग-१ करण्यात आलेल्या जमिनीचे ७/१२ उतारे व दुरुस्ती केलेले ७/१२ उतारे लाभार्थींना प्रत्यक्ष देण्यात आले. विविध योजनांसाठी नव्याने अर्जही स्वीकारण्यात आले.
. यावेळी उप जिल्हाधिकारी व उप विभागीय अधिकारी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले व हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सहकार्य करावे, असे सांगितले.
. कार्यक्रमास उपअधीक्षक भूमिअभिलेख, नायब तहसीलदार मनोज आकनुरवार, नायब तहसीलदार मधुकर काळे, नायब तहसीलदार खंडाळे सह विविध विभागाचे अधिकारी तसेच शेजारील ग्रामपंचायतीचे प्रशासक, मंडळ व महसुल अधिकारी,आदी उपस्थित होते.व मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला.
. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या शिबिराचे संचालन व आभार मंडळ अधिकारी समीर वाटेकर यांनी मानले.


