एकाच गायीने दिला दोन सुदृढ गोऱ्यांना जन्म
नंदोरी गावात आनंदाचे वातावरण
दुर्मिळ योग पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
करण ठाकरे
चंद्रपूर : निसर्गाच्या चमत्काराची प्रचिती अनेकदा थक्क करणारी असते. असाच एक सुखद आणि दुर्मिळ अनुभव भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु. येथे पाहायला मिळाला. येथील पशुपालक दीपक अहिरकर यांच्या मालकीच्या गायीने एकाच वेळी दोन देखण्या गोऱ्यांना (नर वासरांना) जन्म दिला आहे. या बातमीने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून परिसरात या घटनेचीच चर्चा रंगली आहे.

. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज शुक्रवार, दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. सामान्यतः गाय एका वेळेस एकाच वासराला जन्म देते, मात्र अहिरकर यांच्या गायीने जुळ्या गोऱ्यांना जन्म दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, जन्माला आलेली दोन्ही वासरे आणि गाय पूर्णपणे सुदृढ असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
. एकाच वेळी दोन वासरांचा जन्म होणे हे पशुपालनाच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानले जाते. या घटनेची माहिती मिळताच अहिरकर यांच्या गोठ्याकडे नागरिकांनी धाव घेतली. “आमच्या गायीने दोन गोठ्यांना जन्म दिला, हे आमच्या कुटुंबासाठी ईश्वरी वरदानच आहे,” अशी भावना दीपक अहिरकर यांनी व्यक्त केली.
. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नंदोरी बु. येथील नागरिकांनी अहिरकर यांच्या घरी भेट देऊन आनंद व्यक्त केला. एकाच वेळी दोन वासरे होणे ही भाग्याची बाब मानली जात असल्याने, अहिरकर कुटुंबावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


