Home सामाजिक महिला तक्रार निवारण समित्यांचे ऑडिट करा

महिला तक्रार निवारण समित्यांचे ऑडिट करा

281

रूपाली चाकणकर यांचे प्रशासनाला निर्देश

अवैध गर्भपात केंद्रांवर कडक कारवाई करा

चंद्रपूर येथे राज्य महिला आयोगाचा विविध विभागांचा आढावा

चंद्रपूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अंतर्गत तक्रार समितीचे (ICC) ऑडिट करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

.       या महत्त्वपूर्ण बैठकीला महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह आरोग्य, महिला व बालविकास आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

समित्या केवळ कागदावर नकोत !
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या केवळ कागदावर न राहता त्या सक्रिय असल्या पाहिजेत, असे चाकणकर यांनी बजावले. या समित्यांच्या कामकाजाचे नियमित ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आरोग्य आणि सुरक्षिततेवर भर 
जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटरला अचानक भेटी देऊन त्यांची तपासणी करावी. बेकायदेशीरपणे चालणारे सोनोग्राफी आणि गर्भपात सेंटर आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. तसेच प्रत्येक शासकीय कार्यालय आणि आरोग्य केंद्रात महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांची सोय असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थिनी आणि महिलांचे सक्षमीकरण
आदिवासी विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, पालकांची खात्री पटल्याशिवाय आणि अधिकृत ओळखपत्र तपासल्याशिवाय विद्यार्थिनींना कोणासोबतही पाठवू नये. तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना केवळ व्यावसायिक प्रशिक्षण देऊन थांबू नका, तर त्यांना प्रत्यक्ष रोजगाराची साधने उपलब्ध करून देऊन स्वावलंबी करा.

बालविवाह रोखण्याचे आवाहन
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरावरील यंत्रणेला अधिक सतर्क करून प्रतिबंधात्मक पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांची लोकोपयोगी कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

विविध विभागाचे सादरीकरण

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सादरीकरण करतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती, बालविवाह प्रतिबंध, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी असलेल्या योजना आदींबाबत माहिती दिली. तसेच आरोग्य विभागांतर्गत अल्पवयीन मुलींची प्रसुती, महिलांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र,  विशाखा समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, गरोदर महिलांसाठी विशेष उपाययोजना यांच्यासह शिक्षण विभाग, कामगार कल्याण विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर महानगर पालिका आदी विषयांचे सादरीकरण करण्यात आले.

error: Content is protected !!