Home सामाजिक बालसभेच्या व्यासपीठावरून घुमला शिवरायांचा जयघोष !

बालसभेच्या व्यासपीठावरून घुमला शिवरायांचा जयघोष !

352

विद्यार्थ्यांनीच भूषविली सरपंच अन् गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे

इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी हाताळले बालसभेचे कामकाज

जि.प. शाळा नंदोरी (बु.) येथील उपक्रम

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नंदोरी (बु.) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘बालसभे’चे आयोजन करून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी केवळ भाषणेच केली नाहीत, तर प्रशासकीय पदे भूषवून सभेचे कामकाजही चोख पार पाडले.

प्रशासकीय भूमिकेत विद्यार्थी
या बालसभेचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली विविध पदे. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच म्हणून प्रज्ञा ढवस ही विद्यार्थिनी होती. तर गटशिक्षणाधिकारी म्हणून कृष्णाली चामाटे, केंद्रप्रमुख म्हणून स्वरा वर्हाटे, उपसरपंच म्हणून नंदिनी वर्मा, मुख्याध्यापक म्हणून अनुष्का ठेंगणे आणि तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून मंथन लांबट या विद्यार्थ्यांनी मान्यवरांची भूमिका समर्थपणे निभावली. महाराजांच्या जीवनचरित्रावर बोलताना विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि निडरता प्रकर्षाने दिसून आली.

त्रुटींमधून शिकले विद्यार्थी
कार्यक्रमानंतर आयोजित चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी स्वतःच सभेचे विश्लेषण केले. सादरीकरणातील चांगल्या बाबींचे कौतुक करतानाच, राहिलेल्या त्रुटींवरही विद्यार्थ्यांनी मते मांडली. सहकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा हसतमुख स्वीकार करून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील संवाद आणि सुधारणेचा धडा गिरवला.

इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांचे पुढील आव्हान
६ वीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या या पहिल्या बालसभेने शाळेत एक नवा उत्साह निर्माण केला आहे. याच धर्तीवर आता इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी आगामी ८ मार्च रोजी बालसभा घेण्याचे आव्हान स्वीकारले आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दिपाली नागतुरे यांनी केले, तर आभार अनुष्का तुरारे यांनी मानले.

error: Content is protected !!