आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ११.५२ लाखांचा निधी मंजूर
लॉईड मेटल्स घुग्घुसतर्फे विहीर बांधकाम व पंपासाठी मदत
रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. लॉईड मेटल्स घुग्घुस यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून रुग्णालयात विहीर बांधकाम आणि पंप बसविण्यासाठी ११ लाख ५२ हजार ३८८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पाणीटंचाईचा रुग्णांना बसत होता फटका
पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी तातडीने पाठपुरावा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते.
विहीर व पंपामुळे व्यवस्था होणार सक्षम
मंजूर झालेल्या या निधीतून रुग्णालय परिसरात नवीन विहीर खोदण्यात येणार असून त्यावर पंप बसवून पाणीपुरवठ्याची स्वतंत्र आणि सक्षम व्यवस्था उभारली जाईल. यामुळे रुग्णालयाची पाण्याची गरज पूर्ण होऊन आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
आरोग्य सेवा सक्षमीकरणाचा संकल्प
“ग्रामीण भागातील रुग्णालये सुसज्ज असावीत आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे ही काळाची गरज आहे,” असे मत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले.
. या निर्णयामुळे पोंभुर्णा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.


