Home सामाजिक सेवा करण्याच्या वृत्तीतूनच खऱ्या नेतृत्वाचे गुण विकसित होतात – प्रा. श्रीकांत पाटील

सेवा करण्याच्या वृत्तीतूनच खऱ्या नेतृत्वाचे गुण विकसित होतात – प्रा. श्रीकांत पाटील

358

वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालय ‘एन.एस.एस.’ शिबिराचा उत्साहात समारोप

वरोरा : “सेवा करण्याच्या वृत्तीतून नेतृत्व निर्माण होते व सेवेचा मार्गच जीवनाचा आलेख आनंदी करतो. शिबिरातून मिळालेली स्वयंशिस्त, डिजिटल साक्षरता आणि मानवी कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करावे,” असे प्रतिपादन लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांनी केले.

.        लोक शिक्षण संस्थेद्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाचे विशेष निवासी शिबिर जिल्हा परिषद हायस्कूल, भटाळा येथे संपन्न झाले. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “माझा विकसित भारत, डिजिटल साक्षरता आणि मतदान जनजागृतीकरिता युवाशक्ती शिबिर” या संकल्पनेवर आधारित या शिबिराचा समारोप मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी पार पडला, त्याप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लोकशिक्षण संस्थेचे सचिव प्रा. विश्वनाथ जोशी, संस्थेचे सदस्य डॉ. ब्रह्मदत्त पांडेय, महाविद्यालयीन विकास समितीच्या सदस्या सुवर्णरेखाताई पाटील, संस्थेचे सदस्य मंगेश मल्हार, भटाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच धम्मकन्या भालेराव, उपसरपंच हरिदास जाधव, माजी सरपंच बावणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

श्रमदान व आरोग्य सेवा
या सातदिवसीय शिबिरात स्वयंसेवकांनी दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत श्रमदान करून ऐतिहासिक शिव मंदिर परिसर, नॅनो केव परिसर आणि गावातील मंदिर परिसराची स्वच्छता केली. तसेच शिबिरादरम्यान आरोग्य व पशुनिदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.

बौद्धिक सत्रातून वैचारिक मंथन
शिबिरातील बौद्धिक सत्रात सुवर्णरेखाताई पाटील यांनी ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ विषयावर भारतीय स्त्रीशक्तीची ओळख व सहनशीलता पटवून दिली. वामन तुर्के यांनी ‘स्वतंत्र भारताचा सुज्ञ नागरिक’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्तिक खनके यांनी ‘सायबर क्राईम’, तर शुभम पिसे यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध टप्पे’ विशद केले. नंदकिशोर खिरटकर यांनी ‘ग्राम निर्माण कला’ विषयातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज अधोरेखित केली. डॉ. दीपक लोणकर यांनी ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली, तर गजानन मुंडकर यांनी ‘जीवन कौशल्य’ विषयांतर्गत मनुष्याचा स्वभाव ओळखण्याचे स्त्रोत सांगितले.

सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा
शिबिराच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रमात एकल व सामूहिक नृत्य, नाटके सादर करण्यात आली. तसेच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले. समारोप प्रसंगी स्वयंसेवक पहापळे, बदकी व उरकांडे यांनी आपले अनुभव मांडले. गावकऱ्यांच्या वतीने दाते, बावणे व सरपंच भालेराव यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करून पुन्हा शिबिर घेण्याचा आग्रह धरला.

श्रद्धांजली आणि सांगता
समारोप कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीत व लोक शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी (२०२५-२०२६) ध्येय गीताने झाली. यावेळी संस्थेचे दिवंगत उपाध्यक्ष स्व. श्रीकृष्ण घड्याळपाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट ‘उठे समाज के लिये..’ या एन.एस.एस. ध्येय गीताने झाला.

.        कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकांत पुरी यांनी केले, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. रवींद्र शेंडे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, जिल्हा परिषद हायस्कूलचे कर्मचारी व भटाळा ग्रामस्थांनी सहकार्य केले.

 

error: Content is protected !!