५७ व्या पुण्यस्मरण महोत्सवात भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संगम
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
कुचना : भद्रावती तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या मनगाव येथे ५७ वा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा १ व २ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समस्त ग्रामवासीयांचे सहकार्य आणि लोकवर्गणीतून आयोजित या दोन दिवसीय महोत्सवात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
ग्रामस्वच्छतेने सोहळ्याचा प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात १ फेब्रुवारीला सकाळी ‘खराटे महाराज’ आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या ग्रामस्वच्छतेने झाली. त्यानंतर शामराव खामणकर व सहकाऱ्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. सामुदायिक ध्यान व चिंतनाच्या सत्रात प्रकाश वांढरे यांनी ध्यानाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गावातील शालेय मुलांसाठी आयोजित विविध स्पर्धा. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ग्रामगीता वाचन, वकृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुला-मुलींनी या स्पर्धांमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला. रात्री अमरावती येथील युवा कीर्तनकार क्रांती काळे यांचे जनजागृतीपर समाजप्रबोधन कीर्तन संपन्न झाले, ज्यातून त्यांनी राष्ट्रसंतांचे विचार मांडले.
भक्तिमय वातावरणात रामधून दिंडी
सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, २ फेब्रुवारीला सकाळी ध्यानपथ आणि ग्रामसफाई झाल्यानंतर गावातून भव्य ‘रामधून दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीत परिसरातील पाटाळा, करंजी, शेंबळ, कुचना, चालबर्डी आणि राळेगाव येथील भजन मंडळे सहभागी झाली होती. टाळ-मृदंगाच्या गजराने आणि राष्ट्रसंतांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. “आपलेच गाव तीर्थ करूया” हा राष्ट्रसंतांचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी केला.
काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद
सोहळ्याची सांगता ह.भ.प. सुवर्णा पिंपळकर यांच्या रसाळ काल्याच्या कीर्तनाने झाली. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या संपूर्ण दोन दिवसीय पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश वांढरे, प्रशांत काकडे, प्रशांत खामणकर, निलेश खामणकर, नितेश मिलमिले, बबन चटप, संदीप चोपणे यांच्यासह समस्त ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन टोंगे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि बक्षीस वितरण
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच सुनील खामणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमित पांडे, पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपणे, मुख्याध्यापक तुराणकर, शिक्षक भोवरे, हर्षदा शेंडे, सुलोचना दुमोरे, राजेंद्र वांढरे, अनंता काकडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष भारत वांढरे आणि शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप चोपणे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाहुण्यांनी राष्ट्रसंतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर विविध स्पर्धांमधील गुणवंत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनगाव येथील समस्त गुरुदेव भक्त आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.


