महिलांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
आरोग्य मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
चंद्रपूर : महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा, या उदात्त उद्देशाने वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे आणि वेदांती करण देवतळे यांच्या पुढाकाराने २२ जानेवारी २०२६ रोजी नंदोरी (बु) येथे भव्य ‘हळदीकुंकू व स्नेहसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महिलांनी मुख्य प्रवाहात यावे – आ. करण देवतळे
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार करण देवतळे म्हणाले की, “समाजाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. महिलांकडे अनेक कौशल्ये असतात, मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. या स्नेहसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्यांना वाव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांनी आता केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय व्हायला हवे.”
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका – वेदांती देवतळे
वेदांती देवतळे यांनी महिलांशी अतिशय खेळकर आणि आपुलकीच्या वातावरणात संवाद साधला. “कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, स्वतःचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या जिव्हाळ्याच्या संवादामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष आकर्षण : एकपात्री नाटिका आणि आरोग्य प्रबोधन
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे चिमुकली आरोही सतीश अवगान हिने सादर केलेली ‘हळदीकुंकू’ विषयावरील एकपात्री नाटिका. तिच्या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले. तसेच, आरोग्य सेविका डॉ. भूमिका येवले-गिरडकर यांनी बदलती जीवनशैली, स्वच्छता आणि विविध आजारांपासून घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन करून महिलांचे प्रबोधन केले.
![]()
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते अंबर जीवतोडे, माजी पंचायत समिती सभापती विद्या कांबळे, कृ.उ.बा. समिती भद्रावतीच्या उपसभापती अश्लेषा जीवतोडे-भोयर, उपसरपंच उषा लांबट, प्रभागसंघ अध्यक्षा वर्षा भोयर, माजी सरपंच वनिता पावडे यांच्यासह वंदना देरकर, सविता महाकुलकर, जया मेहता, मनीषा तुराणकर, प्रदीप महाकुलकर, चंदू देरकर, गुरुदेव हरणे आणि सोमेश्वर आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
. नंदोरी-मांगली जिल्हा परिषद क्षेत्रातील महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली संजय पावडे व मनीषा नवनीत ठावरी यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


