Home सामाजिक तंटामुक्ती गाव समितीच्या पुढाकाराने दोन प्रेमी युगल विवाह बंधनात

तंटामुक्ती गाव समितीच्या पुढाकाराने दोन प्रेमी युगल विवाह बंधनात

387

सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे आंतरजातीय विवाह सोहळा थाटात

​चंद्रपूर : प्रेमात अडथळे आल्यावर अनेकदा तरुण-तरुणी टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, नंदोरी येथे एका जागरूक सामाजिक कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारामुळे एका प्रेमी युगुलाचा विवाह अत्यंत सुसंस्कृतपणे पार पडला. पळून जाण्याचा निर्णय रद्द करून हे जोडपे तंटामुक्ती समितीच्या साक्षीने हिंदू परंपरेनुसार विवाह बंधनात अडकले.

.        भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथील रहिवासी प्रिया अरविंद सराटे (१८) आणि चोरा येथील रितिक ऋषिकेश घुमे (२४) यांचे मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता, मात्र रितिकच्या वडिलांनी लग्नासाठी दोन वर्षांचा अवधी मागितला. यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रेमी युगुलाने घर सोडून पळून जाण्याचा विचार केला होता. ही बाब नंदोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे यांच्या लक्षात येताच, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या युगुलाला प्रेमाने समजावून सांगितले. त्यांनी तातडीने तंटामुक्त समितीची बैठक बोलावली. बैठकीत दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतल्यानंतर, सर्वांच्या संमतीने या विवाहाचा मार्ग मोकळा करण्यात आला.

.        स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे हा आंतरजातीय विवाह सोहळा पार पडला. यावेळी मुलीचे आई-वडील आणि मुलाचे मित्र आवर्जून उपस्थित होते. तंटामुक्ती समितीच्या या निर्णयाचे आणि मध्यस्थीचे संपूर्ण गावातून कौतुक होत आहे.

.        या तंटामुक्त बैठकीला आणि विवाह सोहळ्याला तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आशुतोष घाटे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, पत्रकार रवी खाडे, संदीप उईके, अमोल लांबट, सुरेश शेंडे, विशाल लांबट, नागो चामाटे, महेश निखाडे, गौरव पावडे, ग्रामपंचायत कर्मचारी विकास लांबट यांच्यासह शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!