5 लाखांचा मुद्देमाल जप्त
वरोरा गुन्हे शोध पथकाची कारवाई
वरोरा : उभ्या असलेल्या वाहनाच्या बॅटरी व डिझेल चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला वरोरा गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अरमान अहेमत निसार शेख (२८), रा. राजुरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या आयसर गाडीसह ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये ट्रकच्या बॅटरी आणि डिझेल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा अज्ञात व्यक्तीने केला असल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान होते. या प्रकरणाचा तपास वरोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाकडे सोपवण्यात आला होता.
. डी. बी. पथकाने अत्यंत कौशल्याने गोपनीय माहिती गोळा करीत राजुरा येथील अरमान शेख याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरी केलेल्या १२ हजार रुपये किमतीच्या २ बॅटरी आणि चोरीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची आयसर गाडी (क्रमांक MH-49-01-83) असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे आणि त्यांच्या पथकातील दिलीप सुर, महेश गावतुरे, सौरभ कुलते, प्रशांत नागोसे, अमोल नवघरे, सुखराज यादव, विशाल राजुरकर, संदीप मुळे व मनोज ठाकरे यांनी केली.


