पोंभूर्णा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे आयोजन
चंद्रपूर : “समाजातील वंचित घटक, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना संवेदनशीलतेने वाचा फोडणे, हीच पत्रकारितेची खरी ओळख आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
. या प्रसंगी पत्रकारांना शुभेच्छा देताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या लेखणीतून समाजमन जागृत ठेवण्याचे पवित्र कार्य पत्रकारांनी यापुढेही तितक्याच प्रामाणिकपणे सुरू ठेवावे. सत्य, अचूकता आणि जबाबदारी या त्रिसूत्रीवर आधारलेली पत्रकारिता हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची मोठी ताकद आहे.
. ते पुढे म्हणाले की, आजच्या आव्हानात्मक काळात निर्भीड, अभ्यासपूर्ण आणि केवळ समाजहिताचा विचार करून मांडली जाणारी भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारितेची ही सत्यनिष्ठ वाट अधिक उजळली जावो आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची भावना कायम राहो, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


