Home सामाजिक टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमले नंदोरी गाव

टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमले नंदोरी गाव

427

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न

उत्कृष्ट भजन व गणेश मंडळांचा गौरव व सत्कार

करण ठाकरे

  चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी बु. येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा १ ते ३ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. टाळ-मृदुंगाच्या गजराने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.

.        या तीन दिवसीय उत्सवात विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू’ आणि ‘हरिपाठा’च्या सुरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. या सोहळ्याचा लाभ परिसरातील हजारो भाविक भक्तांनी घेतला.

बालकिर्तनकाराने मांडल्या सामाजिक व्यथा                                                                                                                                       कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते १ जानेवारी रोजी झालेले नंदोरीतील बालकिर्तनकार यश चिंचोलकर यांचे किर्तन. यशने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. तसेच शेतकरी, शेतमजूर यांच्या व्यथा मांडतानाच, निवडणुकांमधील ‘पैसे देऊन मत मिळवण्याच्या’ चुकीच्या प्रवृत्तीवर परखड भाष्य करत उपस्थितांची मने जिंकली.

मान्यवरांचा व भजन मंडळांचा सत्कार                                                                                                                                                या मंगल प्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर आणि पाहुण्यांनी उपस्थिती लावली. उत्सवाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने शेतकरी उत्पादक महासंघ चंद्रपुर चे अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, दैनिक लोकमत नागपुर चे वरिष्ठ उपसंपादक गोपालकृष्ण मांडवकर व उत्कृष्ट भजन मंडळांचा सन्मानचिन्ह देऊन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला. या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे सर्व भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य महाप्रसाद, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला.

सांस्कृतिक व आध्यात्मिक मेजवानी                                                                                                                                                   या सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार क्रांती मंगेश काळे यांचा कीर्तन सोहळा सामाजिक कार्यकर्ते अंबर जिवतोडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात आले.

पालखी सोहळ्याचे वैभव                                                                                                                                                                   या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग आणि टाळ-मृदंगाचा गजर. फुलांनी सजवलेल्या पालखीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मनोभावे पूजन केले. ठीकठिकाणी नास्ता, चहा चे स्टॉल होते. गावातील प्रमुख मार्गांवरून पालखी मार्ग क्रमण करत लहान हनुमान मंदिर येथे निरोप करण्यात आले. या पालखी सोहळ्यात गावो गावांतून महिला व पुरूषांचे भजन मंडळांचा समावेश होता. सोबतच बाल वारकऱ्यांचा मोठा सहभाग होता.

आ. करण देवतळे यांच्या हस्ते गणेश व दुर्गा मंडळांचा गौरव                                                                                                              २ जानेवारी रोजी गणेश व दुर्गा उत्सव  मंडळांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच मंगेश भोयर होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती धनराज विरुटकर, उपसरपंच उषा लांबट, सेवानिवृत्त शिक्षक किशोर नगराळे, किशोर उमरे, घनश्याम ढवस, विनोद लांबट, देविदास उमरे, आश्लेषा भोयर यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळ समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मंडळांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी                                                                                                                            स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत नंदोरी आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचा आणि महिला शिक्षणातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा गौरव केला. “सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षणाची दारे महिलांसाठी उघडली, त्यांच्या कष्टामुळेच आज महिला प्रगती करत आहेत,” असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागाने हा अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला.

विविध स्पर्धा व बक्षीस वितरण                                                                                                                                                          पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपीय प्रसंगी या स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

 

.        राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण नंदोरी गाव आनंद आणि उत्साहाने भारावून गेले होते. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!