दोन राज्यांच्या प्रशासकीय अधिकार्यांनी मानले माणुसकीचे नाते
जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण यांची तत्परता
अडीच वर्षांनंतर माय-लेकाची भेट ; भावपूर्ण निरोप
प्रशासकीय समन्वयातून कौसल्या कुट्टारमारे यांचे कुटुंबासोबत पुनर्मिलन
चंद्रपूर : मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या आणि ओडिशात पोहोचलेल्या चंद्रपूरच्या कौसल्या विनायक कुट्टारमारे यांचे तब्बल अडीच वर्षांनंतर पुनर्मिलन झाले आहे. प्रशासकीय तत्परता आणि माणुसकीच्या जोरावर त्यांना आज त्यांचा मुलगा सूरज कुट्टारमारे याच्या स्वाधीन करण्यात आले.
. ओडिशामधील झारसुगुडा जिल्ह्यातील कोलाबिरा येथील जगन्नाथ मंदिराजवळ कौसल्या कुट्टारमारे या १९ ऑक्टोबर २०२२ रोजी फिरताना आढळून आल्या होत्या. त्यांची मानसिक प्रकृती ठीक नसल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने एच. कटापल्ली येथील ‘मिशन आश्रय-१’ या पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार आणि देखरेख सुरू होती. झारसुगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण यांनी पुढाकार घेत त्या महिलेची शोध मोहीम सुरु केली. या शोध मोहिमे दरम्यान त्या महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले त्यानंतर झारसुगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण (IAS) यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग (IAS) आणि वरोरा येथील संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्याशी समन्वय साधून महिलेच्या कुटुंबाचा पत्ता शोधून काढला.
. महिलेचा पत्ता लागताच त्यांचा धाकटा मुलगा सूरज कुट्टारमारे आपल्या आईला घेण्यासाठी झारसुगुडा येथे पोहोचला. जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना घरी जाण्यासाठी निरोप देण्यात आला. आपली आई सुखरूप परत मिळाल्याने मुलाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर दोन राज्यांच्या प्रशासकीय अधिकार्यांनी माणुसकीचे नाते जपले. प्रशासनाच्या या संवेदनशील कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


