Home सामाजिक भद्रावतीत विद्यार्थ्यांसाठी श्रीगुरुदेव सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन

भद्रावतीत विद्यार्थ्यांसाठी श्रीगुरुदेव सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन

444

भद्रावती : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी एकदिवसीय श्रीगुरुदेव सुसंस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती यांच्या वतीने ही कार्यशाळा रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी मुरलीधर पाटील गुंडावार लॉन, भद्रावती येथे होणार आहे. या कार्यशाळेत इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.

.      कार्यशाळेची सुरुवात सकाळी ६.३० वाजता होणार असून दिवसभर विविध सत्रांमधून विद्यार्थ्यांना उपासना संस्कार, योग संस्कार, ध्यान संस्कार, आरोग्य संस्कार, जीवन संस्कार, कथा संस्कार, भजन संस्कार, खेळ संस्कार व सुसंवाद संस्कार या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

.      सध्याच्या काळातील विस्कळीत दिनचर्या, दूषित खानपानामुळे होणारे आजार, मोबाईलचा अतिरेक, अश्लील व भडक दृश्यांचा प्रभाव, तसेच शिक्षणातील ताणतणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले मानसिक आजार लक्षात घेता, सुसंस्कारयुक्त शिक्षणातून बालक व तरुणांचे मन घडवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा योग्य विकास व्हावा, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

.       कार्यशाळेत प्रवेशासाठी शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत श्री मुरलीधर पाटील गुंडावार लॉन, सब्जी मार्केट, भद्रावती येथे विद्यार्थ्यांनी शालेय ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सादर करून प्रत्यक्ष नोंदणी करावी लागणार आहे. बाहेरगावातील विद्यार्थ्यांनाही या कार्यशाळेत सहभागी होता येणार असून त्यांच्यासाठी मोबाईलद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

.      या एकदिवसीय सुसंस्कार कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले

error: Content is protected !!