भद्रावती : तालुक्यातील नंदोरी (बु.) येथील शिर नदीवरील बंधाऱ्याला पोचमार्ग नसल्याने ग्रामस्थ त्रस्त होते. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सामुहिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. याची दखल घेत अंबर जीवतोडे यांनी सदर बंधाऱ्यावर स्वखर्चातून तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करून दिले आहे.
. नंदोरी (बु) येथील शिरना नदीवर सन २०१७-२०१८ मध्ये बंधारा मंजूर झाला. त्याचे प्रत्यक्ष काम २०१९-२०२० मध्ये सुरु करून तीन पिल्लर तळापर्यंत तयार करण्यात आले होते. परंतु, त्यानंतर कोरोना महामारीमुळे काम थांबले. आणि नंतर इतर राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून काम बंद पाडण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांनी अनेकदा सदर बंधारावजा पुलाचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. परंतु, ती मागणी हवेत विरली. अद्याप अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. इंदिरानगर मधील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो. विद्यार्थी, शेतमजूर, शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत निधी मंजुरीसह काम ठरलेले असतांना राजकीय सत्ताबदलामुळे ती योजना बंद पडली आणि काम तिथेच थांबले. मंजूर निधीचे काय झाले हा देखील एक ग्रहण प्रश्न आहे.
. या अपूर्ण कामामुळे २०२४ मध्ये एक वृद्ध इसम पुरात वाहून गेला. परंतु, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अलीकडे या बंधारावजा पुलाची मागणी गावकऱ्यांनी प्रभावीपणे मांडून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची जाहीर केले होते. बंधारा नाही तर मतदान नाही, अशा आशयाचे फलक देखील गावातील चौका चौकात झळकले. होते. याची दखल घेत अंबर अशोक जीवतोडे यांनी स्वखर्चातून सिमेंट पाईप आणि मुरूम टाकून तात्पुरता मार्ग तयार करून दिला. गावकऱ्यांनी अंबर जीवतोडे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.


