- मरण आले तरी बेहत्तर
- मनोज ठेंगणे यांचा इशारा
भद्रावती : अरविंद रियालिटी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कोळसा खाण प्रशासनाकडून माजी सैनिक तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी ९ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. १२ मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण हे आंदोलन थांबवणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “या लढ्यात मरण आले तरी बेहत्तर,” असे ठणकावत त्यांनी पत्रपरिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
. मनोज ठेंगणे हे मॅपल ३६५ सेक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीला ऑगस्ट २०२३ पासून टाकळी, जेना, बेलोरा नॉर्थ आणि साउथ येथील कोळसा खाणींमध्ये सुरक्षा कंत्राट देण्यात आले होते. ठेंगणे यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने प्रामाणिकपणे स्थानिकांना रोजगार दिला असून, कंपनीच्या कामकाजाबाबत कोळसा प्रबंधकांनी आजवर कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, अचानक २२ जूनपासून कंत्राट रद्द केल्याचे पत्र देण्यात आले. त्याऐवजी बाहेरील S.I.S. सुरक्षा कंपनीला कंत्राट देण्यात आले असून, त्यामधील सर्व कर्मचारी बाहेरचे आहेत. त्याउलट त्यांच्या कंपनीत ७३ स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचारी कार्यरत आहेत.
. या निर्णयामुळे स्थानिक तरुणांचे रोजगार हिरावले गेले असून, कोळसा कंपनीने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केल्याचा आरोप ठेंगणे यांनी केला. या विरोधात त्यांनी कोळसा कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे उपोषण स्थळी वीज व पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
. ठेंगणे यांनी १२ प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यामध्ये स्थानिक अस्थायी कामगारांना स्थायी करणे, बेलोरा गावाचे आराध्य दैवत असलेल्या भंगाराम मंदिराचे पुनर्वसन करणे, स्थानिक माजी सैनिकाच्या सुरक्षा कंपनीला पुन्हा कामावर ठेवणे, तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोल ॲक्टनुसार वेतन देणे यांचा समावेश आहे.
. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा लाभत असून, उपोषणस्थळी भूपेश पेटकर, अमोल खापनवाडे, दीपक तांदूळकर, मयूर खिरटकर, संतोष लेडांगे, अमीर शेख, माधव तोडासे, प्रणय पतरंगे, गणेश बदकी, सौरभ घोनाडे, शुभम चौधरी, कुणाल गौर, राहुल नंदनवार, मनीष कोसरे, धनराज सहारे आदी उपस्थित होते. मात्र, या आंदोलनाला अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट दिलेली नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
. या प्रकरणी अरविंदो कंपनीचे अधिकारी लक्ष्मणन राव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
