शिक्षण, नोकरी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार
वरोरा : माना जमात विकास संस्था, वरोरा यांच्या वतीने आयोजित ‘गुणवंत गौरव’ सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. समाजातील शिक्षण, नोकरी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. यामध्ये नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांपासून ते निवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत, तसेच १०वी व १२वी मध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष चौखे होते. यावेळी वरोरा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी जगदीश गायकवाड, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्रा. नितीन बारेकर, प्रा. नितीन गजभे, उद्योजक प्रमोद मगरे, सरपंच मनीषा चौधरी, तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुण चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश झाडे, प्राचार्य रूपचंद धारणे, प्रा. अतुल बारेकर (जळगाव) हे मान्यवर उपस्थित होते.
समाजगौरवाचा आदर्श उपक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुण चौधरी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असतो. पुढील वर्षापासून हा कार्यक्रम राज्यस्तरीय पातळीवर घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सत्कारमूर्तींमध्ये शिक्षण क्षेत्रात विशेष यश मिळवणारे विद्यार्थी, नवनियुक्त व पदोन्नती मिळालेले कर्मचारी, तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले युवक-युवती यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख रकमेच्या स्वरूपात सत्कार करण्यात आला.
यशस्वीतेमागे संयम आणि जिद्द सहाय्यक अन्न निरीक्षक कीर्तीका झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर संयम, जिद्द आणि पालकांचा मानसिक पाठिंबा याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात.
विविध क्षेत्रांतील संधी ओळखा सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता, विविध क्षेत्रांतील संधी ओळखून पुढे जाण्याचे आवाहन केले. डॉक्टर-इंजिनियर होण्याबरोबरच कृषी, क्रीडा, कला, उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअर घडवता येते, हे त्यांनी अधोरेखित केले.
भावपूर्ण सुरुवात आणि उत्तम प्रतिसाद कार्यक्रमाची सुरुवात जमातीतील दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गराटे यांनी केले, तर संस्थेचे सचिव संजू जांभुळे यांनी आभार प्रदर्शन केले. वरोरा आणि परिसरातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे हा सत्कार सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.


