- शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या पुढाकारातून जनजागृती अभियान
भद्रावती : हुकूमशाहीच्या विरुद्ध झुंजणाऱ्या धाडसी संघर्षाची यशोगाथा मांडणारे खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे प्रेरणादायी पुस्तक आता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत पोहोचवण्याचे अभियान सुरू झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या पुढाकारातून हे अभियान राबवले जात आहे.
![]()
. मुंबईत मोठ्या उत्साहात प्रकाशन झालेल्या या पुस्तकाच्या हजारो प्रती मागवून, त्या पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक, शासकीय अधिकारी तसेच राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन शिंदे यांनी हाती घेतले आहे.
तुरुंगात लिहिलेली वास्तवाची साक्ष
. खासदार संजय राऊत यांनी तुरुंगवासादरम्यान अनुभवलेल्या अडचणी, अन्याय आणि त्याविरोधातील शांत, पण ठाम लढ्याचे यथार्थ दर्शन या पुस्तकातून घडवले आहे. चुकीच्या आरोपांमुळे कारागृहात राहावे लागूनही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सत्य समोर आणले. हे पुस्तक केवळ लेखन नव्हे, तर संघर्षाचा दस्तावेज म्हणून ओळखले जात आहे.
. या पुस्तकात राऊत यांना तुरुंगात भेट देणाऱ्या निकटवर्तीयांचा उल्लेख असून, त्यात चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची मानली जात आहे.
युवा पिढीसाठी प्रेरणादायी वारसा
. ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक युवकांनी वाचावे, आत्मसात करावे आणि अन्यायाविरोधातील लढ्यासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. आजही न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम असून, संजय राऊत यांचा संघर्ष हा विश्वास अधिक दृढ करणारा ठरतो, असेही त्यांनी नमूद केले.


