वरोरा : ‘विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे काळाची गरज लक्षात घेता कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे’, असे मत वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारोह प्रसंगी प्रा. श्रीकांतजी पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मांडले.
. या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २८ मार्च २०२५ रोज शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य महाविद्यालय वरोरा च्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकशिक्षण संस्था, वरोरा चे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, हिरालाल लोया कनिष्ठ महा. वरोरा चे प्राचार्य महेश डोंगरे, किसान कनिष्ठ महाविद्याला माढेळी चे प्राचार्य हेमंत कावठी हे उपस्थित होते.
. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वागीण विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या कला, साहित्य, वाचन, वक्तृत्व, क्रीडा व सांस्कृतिक आदी कला गुणांना चालना मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात २०२४-२०२५ या शैक्षणिक सत्रात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘विद्यार्थ्यांनी आपले आवडते क्षेत्र निवडताना त्या क्षेत्रचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे’ असे मत महेश डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना मांडले. तर ‘विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी विपुल प्रमाणात वाचन करावे’, असे मत हेमंत कावठी यांनी मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयश्री शास्त्री यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी महाविद्यालयाद्वारा आयोजित विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. उत्तम देऊळकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. तानाजी माने, प्रा. अल्का कुलकर्णी, डॉ. रवींद्र शेंडे, डॉ. दीपक लोणकर यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. श्रीकांत पुरी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.