Home सामाजिक सिंदेवाहीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

सिंदेवाहीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

1094

सर्वोदय महाविद्यालय येथे विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

सिंदेवाही : विज्ञानाच्या फायद्या बद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात आणि शास्त्रीय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विज्ञानाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.

.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे  होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीशील वाटचालीचा आढावा घेतला आणि वैज्ञानिक संशोधनाचे समाजातील योगदान आणि त्याचा राष्ट्रीय प्रगतीमध्ये असलेला महत्त्वाचा वाटा स्पष्ट केला.

.       विज्ञानाचा उपयोग करून स्वबळावरती व्यक्तिगत आणि देशाची प्रगती कशी साधता येईल, यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. भविष्यातील विज्ञान कोणत्या उंचीवर पोहोचू शकते, याची संभाव्य कल्पना विद्यार्थ्यांना देत संशोधनाच्या नव्या संधींबाबत त्यांनी प्रेरणा दिली व विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आग्रह केले.

.       कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा सत्कारमूर्ती डॉ. विनय त्रिपदे होते. त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत रमण प्रभावाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच त्यांच्या लिखित “इंटिग्रल कॅल्क्युलस” या पुस्तकाचे अनावरण मा. प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विनय त्रिपदे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. तुकाराम बोरकर आणि कु. अर्पणा कोवे होते. त्यांनी आधुनिक वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञानाचा समाजावरील प्रभाव आणि भविष्यातील संशोधन संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. विज्ञानाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याच्या संधींबाबत मार्गदर्शन करत, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंतकुमार रामटेके यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन अशोक भोसले यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमादरम्यान प्रा.सुभाष मेश्राम, प्रा. प्रफुल्ल रणदिवे, प्रा. साहेबराव आडे, डॉ. राठोड, श्रेया वरभे, प्रा. नरेंद्र मेश्राम, प्रा. सोनल रामटेके प्रा. सुनील गभने आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि प्रयोगशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाने प्रेरणादायी व ज्ञानवर्धक अनुभव दिला.

error: Content is protected !!