नागभीड पंचायत समितीचा उपक्रम
नागभीड : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून विशेष दखल घेतली जात असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसीय कार्यक्रमाची घोषणा केलेली असून यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी १०० दिवसीय कार्यक्रम दिला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने नागभीड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून ग्राम विकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार ‘गृहोत्सव सोहळा’ आमदार बंटी भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
. यावेळी लाभार्थ्यांना घरकुल योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात आले व माहिती देण्यात आली तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. घरकुल मंजुरी आदेश संजय गजपुरे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष रडके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आवेश पठाण, गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांच्या उपस्थिती मध्ये वितरीत करण्यात आले. यावेळी मंचावर धूर्वे, विस्तार अधिकारी (पंचायत) राऊत, विस्तार अधिकारी (कृषी) बावनकुळे, नोडल अधिकारी (घरकुल) नैताम, ग्रामपंचायत घरकुल टीम, रोजगार सेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्वांसाठी घरे ही देशाचे प्रधानमंत्री यांचे ध्येय असून त्या अनुषंगाने त्वरित गरजुना घरे उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शनात आम्ही कार्य करीत असून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या माध्यमातून शेवटच्या लाभार्थ्याला घरकुल मिळेपर्यंत आम्ही कार्यरत राहू. स्नेहल लाड, गटविकास अधिकारी पं.स. नागभीड


