बल्लारपूर तहसील प्रशासनाचा आदेश
९७ ब्रास रेती साठा केला होता जप्त
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे अवैधरित्या रेती साठा करून असल्याची माहिती तहसील प्रशासनाला मिळाली. माहितीच्या आधारे महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाड टाकून स्मशानभूमी परिसरात तब्बल ९७ ब्रास रेती साठा जप्त करण्याची कारवाई केली. सदर रेती साठा केंद्र व राज्य शासनाच्या घरकुल लाभार्थ्यांना देण्याचा आदेश केला. त्यानुसार विसापूर येथील निवडक गरिब घरकुल लाभार्थ्यांना 3 ब्रास रेती देण्याचा सोपस्कार बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनजंय साळवे यांनी पार पाडला.घरकुल लाभार्थ्यांना रेती मोफत मिळणार असून वाहतूक खर्च द्यावा लागणार आहे. यामुळे अवैध रेती वाहतूक करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील 32 घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 ब्रास रेती देण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीचे महसूल अधिकारी यांना आदेश दिला आहे. यासाठी तात्पुरता वाहतूक परवाना गटविकास अधिकारी धनजंय साळवे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे विसापूर येथील स्मशानभूमी परिसरात सर्व्हे क्रमांक 398 च्या जागेवर हा रेती साठा कोणी जमा करुन ठेवला, याचा थांगपत्ता महसूल प्रशासनाच्या अद्याप लक्षात आला नाही.
बल्लारपूर महसूल प्रशासनाच्या माध्यमातून जप्त केलेल्या रेती साठ्याचे वितरण करण्याचा निर्णय योग्य आहे. परंतु यामध्ये केवळ 32 घरकुल लाभार्थ्यांचा समावेश केल्याने अन्य घरकुल लाभार्थ्यांना घरांचे बांधकाम करण्यासाठी रेती कोठून उपलब्ध होणार, याबाबत सूचना केली नाही. यामुळे लाभार्थ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. जप्त करण्यात आलेल्या रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना देण्यासाठी गटविकास अधिकारी धनजंय साळवे, पंचायत समितीचे घरकुल अभियंता प्रमोद शास्त्रकार ,ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते, महसूल अधिकारी आरती दुलत,सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या सह घरकुल लाभार्थ्यांची उपस्थिती होती.
” महसूल प्रशासनाच्या माध्यमातून बल्लारपूर तालुक्यात कोणताही रेती घाट उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना अवैध मार्गाने बांधकाम करण्यासाठी रेती खरेदी करावी लागते. आधिच शासनस्तरावरून घरकुल योजनेच्या बांधकाम करण्यासाठी केवळ दीड लाख रुपये अनुदान मिळते. आजच्या महागाईच्या काळात यामुळे लाभार्थ्यांचे हक्काचा निवारा म्हणून घरकुल बांधकाम दिवास्वप्न ठरत आहे. यामध्ये रेती चा तुटवडा अडचणीत भर टाकणारी आहे. रेती अभावी गावातील विकास कामे देखील प्रभावित होत आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर.


