Home चंद्रपुर जिल्हा विशेष ​घरात घुसलेल्या संशयित चोरट्याला गावकऱ्यांनी पकडले

​घरात घुसलेल्या संशयित चोरट्याला गावकऱ्यांनी पकडले

24

संशयित चोरटा पोलिसांच्या स्वाधीन

मध्यरात्री ‘काकू’ म्हणून मारली हाक

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह अटक

​चंद्रपूर :  चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदोरी येथे शनिवार, १६ मे च्या मध्यरात्री एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एका घरात घुसलेल्या संशयित चोरट्याला घरच्यांच्या तत्परतेमुळे आणि गावकऱ्यांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळ्यांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

​.         ​मिळालेल्या माहितीनुसार, नंदोरी बस स्टॉपजवळ राहणारे गुणवंत पुसनाके यांच्या घरी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास एका संशयित इसमाने मुख्य गेट काढून आत प्रवेश केला. आत शिरताच त्याने थेट ‘काकू’ म्हणून आवाज देण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित आवाजामुळे गुणवंत पुसनाके यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी प्रसंगावधान राखून आपला मोठा मुलगा अजित याला उठवले.

.         ​अजितने बाहेर येत दरवाजा उघडला आणि “तू कोण आहेस व कशासाठी आलास?” अशी विचारणा केली. त्यावर त्या संशयिताने “मला दारू पाहिजे” असे उत्तर दिले. अजितने अधिक चौकशी करत माजी उपसरपंच भानुदास ढवस यांना फोन करुन माहिती दिली त्यानंतर “तुला दारू मिळण्याचे हे ठिकाण कोणी सांगितले?” असे विचारले असता, “बस स्टॉपवर एका महिलेने मला पाठवले,” असल्याचे त्याने सांगितले . मात्र, संशय आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ बस स्टॉप परिसर पिंजून काढला, तिथे कोणतीही महिला आढळून आली नाही.

.          ​हा थरार सुरू असतानाच, एका पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवरून चार इसम तिथून संशयास्पदरीत्या जाताना दिसले. गावकऱ्यांनी त्यांना थांबण्यासाठी आवाज दिला असता, त्यांनी स्कूटीचा वेग वाढवून तिथून पळ काढला. त्यामुळे पळून गेलेले ते चार जण आणि पकडलेला संशयित इसम हे सर्व एकाच टोळीचे सदस्य असावेत आणि ते चोरीच्या बेताने आले असावे असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

.         ​घटनेची माहिती मिळताच नंदोरी गावाचे माजी उपसरपंच भानुदास ढवस यांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि वरोरा पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच परिसरात ‘डीबी पेट्रोलिंग’ करणारे पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.

.         ​सुरुवातीला दारूचे कारण सांगणाऱ्या या इसमाने आपण बल्लारपूरचे रहिवासी असून वर्ध्याकडे निघाल्याची कबुली पोलिसांना दिली. संशयित आरोपी हा पूर्णपणे नशेच्या धुंदीत होता. त्याच्याकडे विना नंबर प्लेटची ‘एनएस’ मोटरसायकल आढळून आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीला अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे.

​ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

​नंदोरी परिसरात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. असे असतानाही, गेल्या तीन दिवसांपासून नंदोरी गावातील स्ट्रीट लाईट (पथदिवे) रात्रीच्या वेळी पूर्णपणे बंद असल्याचे समोर आले आहे. हे दिवे चालू-बंद करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. मात्र, प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे संपूर्ण गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून, याच अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरटे घरफोड्यांचे धाडस करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ पथदिवे सुरू करावेत, अशी तीव्र मागणी आता गावकऱ्यांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!