जि. प. मराठी शाळेत शिकून हेटी गावच्या जयश्री आणि भाग्यश्रीची पोलीस दलात मोठी झेप
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलींचे यश
जयश्रीची नागपूर तर भाग्यश्रीची चंद्रपूर पोलीस दलात निवड
हेटी गावकऱ्यांकडून जाहीर सत्कार
चंद्रपूर : जीवनात संघर्ष केला की यश मिळते. संघर्षाला आत्मविश्वासाची जोड असायला हवी. जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा हे त्रिकूटच आपल्या पदरात यश मिळवून देते. हे यश मिळवण्यासाठी कडी मेहनत करावी लागते. अशीच कडी मेहनत कोरपना तालुक्यातील अगदी सातशेच्या घरात लोकसंख्या असलेल्या हेटी या गावातील जुळ्या बहिणींनी केली आणि खाकी वर्दी आपल्या पदरात पाडून घेतली. अशा या जिद्दी आणि मेहनती जुळ्या बहिणींचे नाव जयश्री मारोती बुच्चे आणि भाग्यश्री मारोती बुच्चे असे आहे. या जुळ्या बहिणींच्या यशामुळे हेटी या छोट्याशा गावाची पंचक्रोशीत मोठी चर्चा सुरू आहे. गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील दोन जुळ्या बहिणींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस दलात स्थान मिळवून संपूर्ण परिसराचे नाव रोशन केले आहे.
जिल्हा परिषद मराठी शाळेतून घेतली स्वप्नांची भरारी
या दोन्ही बहिणींचे कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. अगदी लहानपणापासूनच त्या दोन्ही बहिणी अभ्यासात अत्यंत हुशार होत्या. त्या केवळ अभ्यासातच नाही, तर मैदानावर खेळतानाही मैदान गाजवायच्या. नृत्याचीही त्यांना विशेष आवड होती आणि सोबतच मस्ती करण्यातही त्या नेहमी अव्वल असायच्या. आज मराठी शाळा कुठेही मागे नाहीत; मराठी शाळेतही शिकून मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती यशस्वीपणे पूर्णही करता येतात, हे जयश्री आणि भाग्यश्रीने आपल्या अभूतपूर्व यशातून सिद्ध करून दाखवून दिले आहे. अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि कठोर मेहनतीच्या प्रवासातून त्यांनी हे यश संपादन केले.
आई-वडिलांच्या अथांग कष्टाचे चीज
या जुळ्या मुलींचे वडील मारोती बुच्चे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. आई सुनीता बुच्चे या घरच्या शेतीत काम करून दुसऱ्याकडे मोलमजुरीचं काम करतात. त्यांची अगदी प्रतिकूल परिस्थिती आहे. बुच्चे दांपत्याला शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे त्यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिलं. आपले आई-वडील करत असलेल्या कष्टाला आणि मेहनतीला मुलींनीही चांगला प्रतिसाद दिला आणि पोलीस दलात यश पदरात पाडलं. अगदी लहानपणापासूनच गरीब परिस्थितीशी सामना करत या दोघींनी शिक्षण आणि स्वप्न यांची योग्य सांगड घातली. त्यांच्या वडिलांनी शेतकरी असूनही मुलींना मोठं करण्याचं स्वप्न जपलं होतं. “मुलींनी शिकून मोठं व्हावे,” ही त्यांची तीव्र इच्छा होती आणि त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आईनेही मुलींना प्रत्येक टप्प्यावर मायेची, संस्कारांची आणि धैर्याची मोलाची साथ दिली.
दुहेरी यशाने गाव भारावले; गावकऱ्यांकडून जाहीर गौरव
कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळालेल्या या यशात जयश्री मारोती बुच्चे हिची निवड नागपूर पोलीस दलात, तर भाग्यश्री मारोती बुच्चे हिची निवड चंद्रपूर पोलीस दलात झाली आहे. या मोठ्या दुहेरी यशामुळे संपूर्ण हेटी गाव आनंदाने भारावून गेले आहे. हेटी येथील गावकऱ्यांनी या दोन्ही जुळ्या बहिणींचा गावात जाहीर सत्कार करून त्यांचा मोठा गौरव केला. त्यांच्या यशामुळे गावातील इतर मुला-मुलींमध्येही आता एक नवी उमेद आणि विश्वास निर्माण झाला आहे. या जुळ्या बहिणी संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून आज सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांची ही यशोगाथा केवळ दोन बहिणींची नसून, ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी ठरली आहे. जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांचे संस्कार यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे.


