१०० होमगार्ड होणार तैनात !
७ राष्ट्रीय व १३ राज्य महामार्गांमुळे वाढला ताण
ड्रंक अँड ड्राईव्हवर कडक कारवाई आणि स्वतंत्र ट्रॅफिक फोर्सची आ. मुनगंटीवार यांची पोलीस महानिरीक्षकाकडे आग्रही मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची गंभीर समस्या आणि वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीवर ठोस उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी त्यांनी राज्याचे पोलीस महानिरीक्षक (IG) मनोज कुमार शर्मा यांच्यासोबत थेट सविस्तर चर्चा केली. ट्रॅफिक व्यवस्थापनाला तातडीने बळ देण्यासाठी किमान १०० होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी या बैठकीत लावून धरली. यामध्ये ७५ पुरुष आणि २५ महिला होमगार्डचा समावेश असावा, असेही आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. या चर्चेनंतर पोलीस महानिरीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, येत्या आठवडाभरात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. यामुळे चंद्रपूरच्या वाहतूक समस्यांवर आता प्रभावी निर्णय होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाढती वाहनसंख्या आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रचंड ताण
. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगत जिल्हा मानला जातो. जिल्ह्यात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, पेपर मिल आणि वीज निर्मिती केंद्रे मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. यासोबतच, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ देखील याच जिल्ह्यात असल्याने येथे पर्यटकांच्या आणि व्यावसायिक वाहनांची २४ तास प्रचंड वर्दळ असते.
. आकडेवारीनुसार, केवळ चंद्रपूर शहरातूनच दररोज सुमारे ६ हजार ते ६ हजार ५०० वाहनांची ये-जा सुरू असते. जिल्ह्यात सध्या एकूण ८ लाख ४१ हजार ४७६ वाहने नोंदणीकृत आहेत. यामध्ये दुचाकी वाहने: ६ लाख ६९ हजारांहून अधिक, चारचाकी वाहने: ७९ हजारांहून अधिक, अवजड (Heavy) वाहने: जवळपास ९० हजार आहे. या नोंदणीकृत वाहनांशिवाय, शेजारील जिल्ह्यातून आणि इतर राज्यांतून येणाऱ्या अवजड व इतर वाहनांची संख्याही अतिशय मोठी आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे मुख्य मार्गांवर प्रचंड ताण निर्माण होऊन नागरिकांना दररोज मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
७ राष्ट्रीय व १३ राज्य महामार्गांचे मोठे आव्हान; पोलीस ठाण्यांवर ताण
. जिल्ह्याच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर येथून ७ राष्ट्रीय महामार्ग आणि १३ राज्य महामार्ग जात असल्याने वाहतूक नियंत्रणाचे आव्हान प्रशासनासाठी अधिक जटिल बनले आहे. चंद्रपूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० (NH-930) हा तर २४ तास वाहतुकीने गजबजलेला असतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आणि महामार्गांचे जाळे मोठे असल्यामुळे, जिल्ह्यातील एकूण ३४ पोलीस ठाण्यांपैकी तब्बल १५ ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून हे राष्ट्रीय महामार्ग जातात. परिणामी, स्थानिक पोलीस ठाण्यांमधील उपलब्ध मनुष्यबळावर कायदा-सुव्यवस्थेसोबतच वाहतूक नियंत्रणाचा मोठा अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. म्हणूनच, वाहतूक व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र आणि सक्षम ट्रॅफिक फोर्सची (Traffic Force) गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
हॉटस्पॉट्स आणि अपघातांची धक्कादायक आकडेवारी
. वाढत्या वाहनांमुळे केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही वाहतुकीची कोंडी गंभीर बनली आहे. सद्यस्थितीमध्ये चंद्रपूर शहरात किमान १२ अशी मुख्य ठिकाणे आहेत, जिथे कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होते. तर ग्रामीण भागातील १४ तालुक्यांतील २० हून अधिक ठिकाणी वाहतूक समस्येची स्थिती अतिशय गंभीर आहे. या वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त वाहतुकीचा थेट परिणाम अपघातांवर होत आहे. गेल्या काही वर्षांतील अपघातांची आकडेवारी सन २०२३: ७९२ अपघात, सन २०२४: ७८५ अपघात, सन २०२५: ७५३ अपघात झाले आहे. गंभीर अपघातांच्या या घटनांमध्ये सातत्याने होणारी वाढ ही सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक ठरत असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
विधानसभेत सातत्याने आवाज आणि रिंग रोडची मागणी
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील या वाहतूक समस्यांबाबत केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर थेट राज्याच्या विधानसभेतही सातत्याने आणि प्रभावीपणे आवाज उठवला आहे. चंद्रपूर शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी आणि शहरांतर्गत कोंडी फोडण्यासाठी ‘रिंग रोड’ची (Ring Road) असणारी वाढती गरज त्यांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासोबतच, जिल्ह्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या (मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे) वाढत्या घटनांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विशेष मोहीम राबवून कडक कारवाई करण्याची गरज त्यांनी यापूर्वीही अधोरेखित केली आहे.
तातडीच्या अतिरिक्त उपाययोजनांवर भर
पोलीस महानिरीक्षकांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेदरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील अपुरे मनुष्यबळ, अवजड वाहनांची वाढती संख्या आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर गंभीर चिंता व्यक्त केली. केवळ हंगामी उपाय न करता आधुनिक ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील मुख्य चौक, महामार्ग आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिसांच्या सोबतीला तातडीने होमगार्ड तैनात केल्यास वाहतुकीला शिस्त लागेल. या मागण्यांची पोलीस प्रशासनाकडून लवकरच अंमलबजावणी होणार असून, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


