आ. करण देवतळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दिलासा
करंजी रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेती
आर्थिक भार कमी होऊन घरकामांना मिळणार गती !
वरोरा : तालुक्यातील करंजी रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप योजनेचा शुभारंभ आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, घर बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती आता मोफत उपलब्ध होणार आहे.
. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार करण देवतळे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मोफत रेती वाटपामुळे लाभार्थ्यांचा आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल आणि घरकुलांची प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
. या विशेष कार्यक्रमास वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, उपविभागीय अधिकारी संदिप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर आणि गट विकास अधिकारी मुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच बाळू भोयर, देविदास ताजने, सुजित कष्टी, प्रभाकर कष्टी, निलेश मिलमिले, रामदास गाडगे यांसह स्थानिक पदाधिकारी, प्रशासनातील इतर अधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
. शासनाच्या या लोकहितकारी आणि संवेदनशील निर्णयाचे लाभार्थ्यांनी मनापासून स्वागत करत तीव्र समाधान व्यक्त केले. गरजू नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने कार्यरत असल्याचा विश्वास या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला.


