शासकीय कामासाठी आता चकरा मारण्याची गरज नाही
‘चांदा महसूल मित्र’ चॅटबोट आणि ऑनलाईन अभ्यागत फॉर्म सेवा सुरू !
इंधन बचत आणि नागरिकांचा त्रास वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचा अभिनव उपक्रम
घरबसल्या तक्रार निवारणाची सुविधा
चंद्रपूर : पश्चिमी आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी सर्व नागरिकांना काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे जाहीर आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागरिकांना आता शासकीय कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची कोणतीही गरज पडणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
. नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांचा वेळ आणि शारीरिक त्रास वाचावा, तसेच प्रवासासाठी लागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलची बचत भयावी, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून व कल्पकतेतून नागरिकांसाठी विशेष ‘चॅटबोट’ क्रमांक आणि ‘ऑनलाईन अभ्यागत सेवा फॉर्म’ अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे.
‘चांदा महसूल मित्र’ चॅटबोटद्वारे घरबसल्या कामे
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘चांदा महसूल मित्र’ या नावाने अत्याधुनिक चॅटबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी 9284061588 हा मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला आहे. नागरिकांना आता महसूल विभागाशी संबंधित कोणत्याही सेवा, त्यांच्या दैनंदिन अडीअडचणी किंवा विविध तक्रारींचे निवारण या क्रमांकावर संपर्क साधून घरबसल्या मिळवता येणार आहे. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन अभ्यागत फॉर्म: थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार तक्रार
जिल्हाधिकारी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून आपली समस्या मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्यक्ष भेटीऐवजी ‘ऑनलाईन अभ्यागत सेवा फॉर्म’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक एका विशेष गुगल लिंकद्वारे https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSfwVvlCvdfLZVZ४NEW५_a-FedlRxve४Alrmmd५०९२OlkeL-gA/viewform?usp=publish-editor येथे आपली तक्रार नोंदवू शकतात.
. या डिजिटल फॉर्ममध्ये नागरिकांना आपली संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने अभ्यागताचे पूर्ण नाव, चालू मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) आणि संपूर्ण पत्ता, गाव व तालुक्याची माहिती द्यावी लागेल. यासोबतच, नागरिकांना त्यांच्या कामाचे किंवा समस्येचे नेमके स्वरूप स्पष्ट करावे लागेल आणि संबंधित कार्यालय, शाखा, अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे नाव माहिती असल्यास त्याचाही उल्लेख करावा लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तक्रारीशी संबंधित आवश्यक ती सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करून नागरिकांना हा फॉर्म सबमिट करायचा आहे. हा फॉर्म जमा होताच संबंधित विभागामार्फत त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाचे जाहीर आवाहन
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे नागरिकांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे अधिकृत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


