Home सामाजिक सीडीसीसी बँकेचे ‘डिजिटल’ पाऊल

सीडीसीसी बँकेचे ‘डिजिटल’ पाऊल

8

‘कृषी ३६०’ प्रणालीद्वारे पीक कर्ज प्रक्रिया होणार हायटेक !

१९ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

शेतकऱ्यांना त्रासातून मिळणार कायमची मुक्ती

चंद्रपूर : बदलत्या ऑनलाईन युगाची गरज ओळखून स्वतःला सातत्याने अपडेट ठेवणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (CDCC) सहकार क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. शेतकरी हितासाठी नवनवीन धाडसी निर्णय घेण्याच्या आपल्या परंपरेला जागत बँकेने आता पीक कर्ज वाटप पद्धतीचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने ‘कृषी ३६०’ ही अत्याधुनिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, १९ मे रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर येथील मुख्य कार्यालयातील मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडणार आहे.

.      आजच्या वेगवान काळात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवताना अनेक कागदोपत्री अडचणींचा आणि विलंबाचा सामना करावा लागतो. हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी बँकेने तंत्रज्ञानाची कास धरली आहे. या ‘कृषी ३६०’ प्रणालीमुळे अत्यंत सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे आता शक्य होणार असून, यामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या त्रासातून सुटका होईल.

दिग्गजांची लाभणार उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे असतील. या प्रणालीच्या लोकार्पण सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, नागपूर विभागीय सहनिबंधक प्रविण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर आणि नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन
सहकार आणि तंत्रज्ञानाचा हा सुवर्णसंगम तसेच जिल्ह्यातील या महत्त्वपूर्ण बदलाचे साक्षीदार होण्यासाठी शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेशखान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आणि समस्त संचालक मंडळाने केले आहे.

error: Content is protected !!