Home विशेष ‘वैद्यनाथ फंड’ वसुली तात्काळ थांबवा, अन्यथा शासनाकडे तक्रार करणार !

‘वैद्यनाथ फंड’ वसुली तात्काळ थांबवा, अन्यथा शासनाकडे तक्रार करणार !

10

काँग्रेस नेते वसंत मुंडे यांचा परळी बाजार समितीला इशारा

परळी : शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या पट्टीमधून बेकायदेशीररीत्या केली जाणारी ‘वैद्यनाथ फंड’ वसुली तात्काळ रद्द करावी, अशा स्पष्ट आदेशांनंतरही परळी कृषी उत्पन्न बाजार समिती कारवाई करत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ही वसुली न थांबल्यास थेट शासनाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी २० डिसेंबर २०१४ रोजीच शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त सेवा शुल्क वसूल करू नये, असे आदेश दिलेले आहेत. मात्र, परळी बाजार समितीमध्ये अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीच्या पट्टीमधून ‘वैद्यनाथ फंड’ म्हणून ०.६ पैसे वसूल केले जात आहेत. हा फंड बाजार समितीच्या सहकार्याने वैद्यनाथ मंदिराकडून घेतला जातो, असा आरोप मुंडे यांनी केला आहे.

राजकीय दबावाचा आरोप
वसंत मुंडे यांनी पुढे म्हटले की, “राज्यात इतर कोणत्याही बाजार समितीमध्ये अशा प्रकारे अतिरिक्त फंड वसूल केला जात नाही. बाजार समितीच्या कायद्यातही अशी कोणतीही तरतूद नाही. असे असूनही सहाय्यक निबंधक (परळी) आणि जिल्हा उपनिबंधक (बीड) हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत. शासनाच्या आदेशांचे पालन न झाल्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.”

व्यापाऱ्यांची अडवणूक
केवळ शेतकरीच नव्हे, तर व्यापाऱ्यांना लायसन्स देण्याच्या वेळीही बाजार समितीकडून वैद्यनाथ फंडाच्या नावाखाली अडवणूक केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेली ही लूट थांबवण्यासाठी आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत तर हे प्रकरण मंत्रालय स्तरावर नेण्याचा इशारा वसंत मुंडे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!