काँग्रेसचे मनपा आयुक्तांना साकडे
कामात पारदर्शकता आणण्यासाठी ‘सफाईपूर्वी’ आणि ‘सफाईनंतर’चे फोटो बंधनकारक करण्याची मागणी
हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, तरीही दरवर्षी पावसाळ्यात रस्ते जलमय होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते. यावर्षी ही परिस्थिती टाळण्यासाठी नालेसफाई केवळ कागदावर न राहता ती दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करून साकडे घातले आहे.
पारदर्शकतेसाठी नव्या अटींची मागणी
काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संतोष लहामगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. कामात पारदर्शकता आणण्यासाठी सफाई करण्यापूर्वीचे आणि सफाई झाल्यानंतरचे फोटो काढणे कंत्राटदारांना बंधनकारक करावे, अशी महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. तसेच, शहरातील तिन्ही झोनमध्ये काम सुरू असताना संबंधित विभागाचे किमान दोन कर्मचारी देखरेखीसाठी नियुक्त करावेत, जेणेकरून कामाच्या दर्जावर नियंत्रण राहील.
नगरसेवकांचे ‘समाधानकारक प्रमाणपत्र’ अनिवार्य करा
ज्या प्रभागात सफाई होणार आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींना (नगरसेवकांना) कामाची पूर्वसूचना द्यावी. काम पूर्ण झाल्यावर संबंधित नगरसेवकांचे ‘समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र’ घेतल्याशिवाय देयके अदा करू नयेत, अशीही मागणी लहामगे यांनी केली आहे. केवळ यंत्रांच्या वापरावर अवलंबून न राहता, जिथे नाले अरुंद किंवा गोलाकार आहेत, तिथे मनुष्यबळाचा वापर करून संपूर्ण गाळ काढण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या भागातील नालेसफाईकडे विशेष लक्ष द्या
विशेषतः जिल्हा परिषद समोरील पेट्रोल पंप ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुतळ्यापर्यंतची नाली उन्हाळ्यातही चोकअप असल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक उग्र रूप धारण करून रस्ता बंद होऊ शकतो, त्यामुळे या विशिष्ट भागातील नालीसफाई प्राधान्याने करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने आतापासूनच कडक पावले उचलून कामाचा दर्जा राखल्यास नागरिकांना जलमय रस्त्यांच्या त्रासापासून सुटका मिळेल. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जर कामात हलगर्जीपणा दिसून आला, तर काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
. याप्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्णा कोंड्रा, नगरसेवक रामनरेश यादव, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर व शहजाद अहेमद, अतुल ठाकरे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


