Home सामाजिक नागलोन येथे महामानवाला ‘ज्ञानवंदना’

नागलोन येथे महामानवाला ‘ज्ञानवंदना’

15

वेकोली अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून शालेय वस्तूंचे वाटप

कुचना : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागलोन येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीमध्ये वेकोली (WCL) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा एक स्तुत्य उपक्रम राबविला. ‘युजी टू ओसी’ खुली कोळसा खदान नागलोन येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

अल्पभूधारक व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
या उपक्रमांतर्गत अंगणवाडीतील १० चिमुकल्यांना आकर्षक वॉटर बॉटल देण्यात आल्या. तसेच, जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील २८ विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, वही संच, कंपास पेटी, पेन आणि पेन्सिल सेट यांसारखे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

प्रेरणादायी विचारांची मांडणी
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय भाषणात सब एरिया एक्साव्हेशन अभियंता चंद्रशेखर नगराळे म्हणाले की, “परिस्थिती कितीही बिकट असली तरी मनातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती देश बदलू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. आपण सर्वांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवला पाहिजे.”

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी शाळेचे शिक्षक गणेश चिडे, शिक्षिका आशा जोगी, तसेच वेकोलीचे कर्मचारी दत्ता कोंबे, महेश श्रीरंग, गुंडावार, चहांदेजी, भारत ठक, डॉ. तूरकर, ऋषीं रामटेके, नितीन पेटकर, अनिल मेश्राम, दर्शना गेडाम, विशाल गोंडे, विनोद देठे, रवींद्र झाडे, ललित बदखल व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोबतच शाळा सुधार समितीचे सदस्य जयंत महातळे, प्रदीप सोयाम, महादेव बघेल व गावकरी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीचा संकल्प
कार्यक्रमाची सांगता महेश श्रीरंग यांनी उपस्थितांचे आभार मानून केली. केवळ जयंती उत्सव न साजरा करता, दरवर्षी अशाच पद्धतीने समाजोपयोगी उपक्रम राबवून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार यावेळी वेकोली कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

 

error: Content is protected !!