पालकमंत्र्यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश
नागरिकांनीही उन्हापासून संरक्षणासाठी योग्य दक्षता घेण्याचे डॉ. अशोक वुईके यांचे आवाहन
चंद्रपूर : गेल्या पंधरवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात दैनंदिन तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या उन्हाचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत असून, योग्य काळजी न घेतल्यास उन्हाच्या तीव्रतेमुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, उष्माघात नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले आहेत. तसेच, नागरिकांनीही उन्हापासून संरक्षणासाठी स्वतःची योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि. २८) उष्माघात नियंत्रण कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीत डॉ. वुईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेला दिलेले महत्त्वाचे निर्देश
बैठकीत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, उष्माघाताबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करणे काळाची गरज आहे. उष्माघाताची लक्षणे, उन्हात घ्यावयाची काळजी, काय करावे आणि काय करू नये, या बाबींची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आणि उष्माघात संपर्क अधिकाऱ्यांची यादी सार्वजनिक करावी. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात रुग्णांसाठी स्वतंत्र राखीव खाटांची व्यवस्था करण्यात यावी. ज्या कक्षात हे रुग्ण असतील, तिथे कुलरसह थंड हवेची आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची चोख सोय असावी. तातडीच्या उपचारांसाठी आवश्यक असलेला ओआरएस (ORS) आणि औषधी साठा सर्व केंद्रांवर मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवावा. तसेच, गंभीर रुग्णांना त्वरित हलवण्यासाठी (Referral) रुग्णवाहिकांची उपलब्धता २४ तास सुनिश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
. जिल्ह्यातील वाढता पारा पाहता प्रशासनाने सर्व सोयीसुविधांसह सज्ज राहावे आणि नागरिकांनीही दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळून प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उष्णतेची लाट : जागतिक हवामान संघटनेनुसार सलग पाच दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस दररोज कमाल तापमान, सरासरी कमाल तापमानापेक्षा 5 अंश सेल्सीअसने जास्त असते, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. मैदानी भागात तापमान किमान 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर उष्णतेची लाट मानली जाते.
उष्णतेच्या लाटेसंबंधी आजाराची लक्षणे : 1) चक्कर येऊन पडणे, 2) फेफरे किंवा झटके येणे, 3) झोपेतून उठण्यास त्रास होणे / उठता न येणे, 4) गोंधळल्यासारखे बोलणे / वागणे, 5) श्वासाची व हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे, 6) शरीराचे तापमान 105 अंश फॅरनहिट (40.5 अंश सेल्सिअस) पेक्षा अधिक होणे, 7) स्नायुत पेटके येणे, 8) चिडचीड होणे, 9) डोकेदुखी, अशक्तपणा येणे, 10) मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.
काय करावे : 1) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे, 2) डोक्यावर टोपी, रुमाल, टॉवेल किंवा छत्री वापरावी, 3) उन्हात बाहेर जातांना डोळ्यावर गॉगल्स लावावा, 4) कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी कमी तापमानात करावी.
काय करू नये : 1) दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे, 2) उन्हात अतिकष्टाची कामे करू नये, 3) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये, 4) गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे, 5) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खावू नये.
येथे करा संपर्क : उष्माघाताबाबत संपर्क करावयाचा असल्यास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250400.


