गिरनार चौकात रंगणार भव्य ‘फायर शो‘ आणि जंगी स्वागत !
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शोभायात्रेचे अभूतपूर्व नियोजन
भाविकांच्या सुविधेसाठी ‘फ्रुटी‘ वाटप अन् नयनरम्य रोषणाईची मेजवानी
चंद्रपूर : प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त चंद्रपूर शहरात भक्तीचा महाकुंभ उसळणार आहे. श्रीरामनवमीच्या पावन आणि मंगलमय उत्सवानिमित्त दिनांक २६ मार्च रोजी शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेच्या स्वागतासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार व मुनगंटीवार परिवारातर्फे स्थानिक गिरनार चौक येथे एका विशेष आणि भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाशात झळाळणारा ‘अतिशय आकर्षक फायर शो’, जो या उत्सवाच्या दिमाखात अधिक भर घालणार आहे.
. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी निमित्त संपूर्ण चंद्रपूर शहर राममय झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. हजारो नागरिक मोठ्या श्रद्धेने या शोभायात्रेत सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर, शोभायात्रेतील भक्तांचे स्वागत करण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी गिरनार चौकात जय्यत तयारी केली आहे.
भाविकांसाठी शीतपेयाचे वाटप
सध्या वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक नागरिकांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक भावनेतून मुनगंटीवार परिवारातर्फे ‘फ्रुटी’ या शीतपेयाचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात येणार आहे. यामुळे रणरणत्या उन्हात रामभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार मुनगंटीवार करणार विधिवत पूजन
या सोहळ्याचे औचित्य साधून आमदार सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार स्वतः शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजन करण्यात येईल. श्रीरामांच्या आदर्श विचारांचे स्मरण करत आणि धार्मिक परंपरांचा सन्मान राखत हा सोहळा भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे.
फायर शो ठरणार आकर्षणाचे केंद्र
गिरनार चौक येथे होणारा ‘फायर शो’ हा यंदाच्या शोभायात्रेचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. यासोबतच करण्यात आलेली आकर्षक रोषणाई आणि उत्साहवर्धक वातावरण यामुळे हा सोहळा नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. तरी या भव्य स्वागत सोहळ्याचा आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमाचा शहरातील सर्व नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


