‘अनिरुद्ध नक्षत्र’चा भव्य पदवीदान सोहळा ४ एप्रिलला
संशोधन आधारित आध्यात्मिक शिक्षण प्रणालीचा होणार शुभारंभ
देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती
चंद्रपूर : अध्यात्म आणि ज्योतिष शास्त्राला आधुनिक संशोधनाची जोड देणाऱ्या ‘अनिरुद्ध नक्षत्र इंटरनॅशनल’ संस्था, मुंबईच्या वतीने आगामी ४ एप्रिल २०२६ रोजी भव्य स्नेह समारंभ व पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील बोरिवली (पश्चिम) येथील हॉटेल राधाकृष्ण बँक्वेट येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी पं. सतीश गुरुजी यांनी दिली आहे.
. संस्थेच्या संस्थापक व कुलगुरू डॉ. समीक्षा शिरीष दारवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या कार्यक्रमाचा आराखडा निश्चित करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेच्या उत्तीर्ण ज्योतिष अभ्यासकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून मेडिकल एस्ट्रोलॉजी, पीएचडी, महर्षी पदवी आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याचे अध्यक्षपद श्रीयुत अनिल महामुनी भूषवणार असून, उपाध्यक्ष म्हणून श्रीयुत अजिंक्य नालोले उपस्थित राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत नंदकिशोर जकातदार, श्रीयुत निलेश कुलकर्णी आणि श्रीयुत प्रदीप पंडित यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्रीयुत सुहास समुद्र मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक श्रीयुत हेमंत उपासनी यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनाने हा सोहळा अधिक समृद्ध होणार आहे.
नव्या शिक्षण प्रणालीची घोषणा
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. समीक्षा दारवलीकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त आणि संशोधन आधारित ‘संरचित आध्यात्मिक शिक्षण प्रणाली’चा शुभारंभ केला जाणार आहे. टॅरो मास्टरी, अंकशास्त्र आणि वैदिक ज्योतिष यांचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करून आध्यात्मिक शिक्षणाला व्यावसायिक व शैक्षणिक स्वरूप देण्यावर या प्रसंगी विचारमंथन करण्यात येईल.
. या नियोजित बैठकीला पं. सतीश गुरुजी, डॉ. हेमंत उपासनी, डॉ. ज्योतिष मित्र मिलिंद, श्री संतोष अंबावले, श्री दीपक पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी खात्री कुलगुरू डॉ. दारवलीकर यांनी व्यक्त केली आहे.


