Home सामाजिक एकार्जुना भाजीपाला संशोधन प्रकल्पाला गती

एकार्जुना भाजीपाला संशोधन प्रकल्पाला गती

157

१५ एप्रिलपर्यंत रोडमॅप सादर करण्याचे राज्यमंत्र्यांचे निर्देश

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

२५.८९ कोटींच्या प्रकल्पातून विदर्भातील शेतीचा कायापालट होणार

चंद्रपूर : एकार्जुना (ता. वरोरा) येथे उभारण्यात येणाऱ्या २५.८९ कोटी रुपयांच्या उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन प्रकल्पाला गती देण्यासाठी आज मुंबई येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या अंमलबजावणीस वेग देत, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण व बाजारपेठेची जोड देण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय व दिशा निश्चित करण्यात आली.

.      बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, विदर्भात सध्या लसूण, कांदा, भेंडी, मिरची, वांगे, वाल, शेंगा, हळद आदी नऊ प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड होत असून, २३ प्रकारच्या कापूस पिकांचे उत्पादन घेतले जाते. एकूण ११,२८३ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसंख्येनुसार भाजीपाला उपलब्धता व गरज यांचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

.      आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले, विदर्भातील पिकांचे मॅपिंग, डेटा कलेक्शन मजबूत करणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे, जास्त मागणी असलेल्या पिकांची ओळख करून त्यावर संशोधन वाढवणे तसेच वर्षभर भाजीपाला उपलब्ध राहील अशा पद्धतीने संशोधन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

.      कृषी नियोजनाच्या दृष्टीने प्रकल्पासाठी उपलब्ध निधीचे वेळबद्ध नियोजन, देशी बियाण्यांच्या वापराला चालना, बाजारपेठेशी जोड (मार्केट लिंकज) मजबूत करणे तसेच Soil Health Card नुसार लागवडीसाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यासोबतच ड्राय भाजीपाला लागवडीवरही विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

.       प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत आणि जलदगतीने पूर्ण व्हावे, मंजूर निधीचा पारदर्शक व प्रभावी वापर व्हावा तसेच स्थानिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा थेट व दीर्घकालीन लाभ मिळावा, यासाठी प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची ठोस मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. यासोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागावे आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.या संदर्भात राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देत कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले.

.      संशोधन व नवकल्पनांच्या बाबतीत जगातील विविध पालेभाज्या व जातींचा अभ्यास, पडीत जमिनीचा उपयोग करून पिकांचे नियोजन, जातनिहाय संशोधन आणि एक व्यापक रोडमॅप तयार करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत मांडलेल्या सर्व मुद्द्यांची दखल घेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्यासाठी सर्व बाबींचा सखोल विचार करून १५ एप्रिलपर्यंत सविस्तर रोडमॅप तयार करून सादर करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

.       या बैठकीत विदर्भातील भाजीपाला उत्पादनातील तफावत भरून काढण्यासाठी वैज्ञानिक, डेटा-आधारित आणि बाजारपेठ-केंद्रित दृष्टिकोन अवलंबण्याचे स्पष्ट करण्यात आले. उत्पादनापासून ते बाजारपेठेपर्यंत संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर देत, या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!