Home सामाजिक महालगाव (बु.) मध्ये विकासाची गुढी

महालगाव (बु.) मध्ये विकासाची गुढी

209

तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे थाटात लोकार्पण !

जिल्हा बँक अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

वरोरा : तालुक्यातील महालगाव (बु.) येथील विकास प्रवासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी कोरला गेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकारलेल्या ‘दिपज्योती ग्रामसंघ कार्यालय इमारत’, ‘सेवा सहकारी संस्था कार्यालय इमारत’ आणि ‘संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे भव्य प्रवेशद्वार’ या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा ‘उद्घाटन व लोकार्पण सोहळा’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

.      या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित होते. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक सक्षम व्हावी आणि महिला बचत गटांना हक्काची जागा मिळावी, या उदात्त हेतूने या वास्तूंची उभारणी करण्यात आली आहे. सहकार आणि रोजगाराच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.

.     या सोहळ्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक जयंतराव टेमुर्डे, देखरेख सहकारी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. काळे, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, माजी सरपंच अभय मिलमिले, पोलीस पाटील मंजुषा वांढरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष बापूराव दानव, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनराव उरकुडे, दिपज्योती ग्रामसंघाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना बदकी आणि मुख्याध्यापक वसंतराव राखुंडे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महालगावच्या या विकासकार्याबद्दल सर्व स्तरांतून ग्रामस्थांचे अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!