Home चंद्रपुर जिल्हा विशेष ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्प रद्द करा

‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्प रद्द करा

456

खा. प्रतिभा धानोरकर यांचा बंडू धोतरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

१८ हजार वृक्षांची कत्तल आणि व्याघ्र कॉरिडॉरला धोका

ताडोबा वाचवण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग सत्याग्रह

चंद्रपूर : लोहारडोंगरी लोह खनिज उत्खनन प्रकल्पामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरला निर्माण झालेला धोका आणि वाढता मानवी-वन्यजीव संघर्ष याकडे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘अन्नत्याग सत्याग्रह’ पुकारला आहे. या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आपला खंबीर पाठिंबा दर्शविला.

.        खासदार धानोरकर यांनी यावेळी सांगितले की, या प्रकल्पामुळे सुमारे १८,०२५ वृक्षांची कत्तल होणार असून वाघांचा नैसर्गिक मार्ग खंडित होईल. जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत वन्यजीव संघर्षात २०० हून अधिक नागरिकांचा बळी गेला असून, केवळ २०२५ मध्येच ४७ मृत्यू झाले आहेत. अशा स्थितीत केवळ आर्थिक नफ्यासाठी निसर्ग आणि मानवी जीवाचा बळी देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी बंडू धोतरे यांच्या १६ प्रलंबित मागण्यांवर चर्चा करून वन्यजीव संवर्धन आणि स्थानिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली.

.        खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यापूर्वीच केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाची वन्यजीव मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात २५,००० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेद्वारे आपला विरोध नोंदविला आहे. बंडू धोतरे यांच्या मागण्यांमध्ये राज्य सरकारच्या तांत्रिक समिती अहवालाची अंमलबजावणी करणे, बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविणे, वाघांच्या ‘कॅरिंग कॅपेसिटी’चा अभ्यास करणे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वन्यजीव उपशमन योजना राबविणे अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. “स्थानिक जनतेच्या भावना आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मी संसदेत आणि संबंधित मंत्रालयाकडे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

error: Content is protected !!