Home सामाजिक शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करा

शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करा

257

२ लाखांची कर्जमाफी म्हणजे जखमेवर मीठ ! 

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महायुती सरकारवर घणाघात

अर्थसंकल्पाचा केला जाहीर निषेध

चंद्रपूर : महायुती सरकारने नुकताच मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची जादुगिरी आणि घोषणांचा पाऊस असल्याची तिखट प्रतिक्रिया चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे. सरकारने जाहीर केलेली २ लाखांची कर्जमाफीची मर्यादा म्हणजे बळीराजाच्या दुःखावर मीठ चोळण्याचा निंदनीय प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

.     आजचा शेतकरी लाखो रुपयांच्या कर्जाखाली दबलेला असताना, केवळ २ लाखांचे गाजर दाखवून सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे. “आमची मागणी स्पष्ट आहे—शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करा, तरच त्याला खरा दिलासा मिळेल,” असे प्रतिपादन खासदार धानोरकर यांनी केले. विदर्भातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याबाबत सरकारने पुन्हा एकदा मौन पाळल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

.     विदर्भाच्या विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, सिंचन प्रकल्प, औद्योगिक विकास आणि स्थानिक पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रासह संपूर्ण विदर्भाच्या तोंडाला सरकारने पुन्हा एकदा पाने पुसली आहेत.

.     सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी केवळ ‘डिजिटल’ स्वप्ने दाखवून बेरोजगारांची थट्टा करण्यात आली आहे. तसेच महागाईने होरपळणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना आणि गृहिणींना दिलासा देण्याऐवजी सरकारने केवळ कागदी योजना जाहीर केल्या आहेत. हा अर्थसंकल्प कष्टकरी, शेतकरी आणि तरुणांचा विश्वासघात करणारा, दिशाहीन आणि जनविरोधी असून आपण याचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

error: Content is protected !!