९ मार्चपासून आधारभूत किमतीने चणा व तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू
बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच खरेदी केंद्र
सभापती राजू डोंगे यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना दिलासा
भद्रावती : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार (MSP) चणा व तूर खरेदीच्या नोंदणीला ९ मार्च २०२६ पासून कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती येथे सुरुवात होत आहे. ही नोंदणी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात होईल, तर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया चंदनखेडा येथील उपबाजारात राबवली जाणार आहे.
. भद्रावती बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच अशी शासकीय खरेदी होणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आतापर्यंत येथील शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी वरोरा बाजार समितीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता ही सुविधा घरच्या तालुक्यातच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतुकीचा खर्च वाचणार आहे.
. बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, “पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा मिळवून देणे आणि समितीचे उत्पन्न वाढवणे हे आमचे ध्येय आहे. या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल आणि त्यांची पायपीट थांबेल.”
. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या चणा व तूर विक्रीसाठी भद्रावती बाजार समिती येथे नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


