Home सामाजिक महसूल सेवा आता थेट जनतेच्या दारी

महसूल सेवा आता थेट जनतेच्या दारी

275

वरोरा तहसील कार्यालयाचा ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उपक्रम

वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या सूचनेनुसार, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी आणि शासकीय सेवा पारदर्शकपणे पोहोचवण्यासाठी वरोरा तहसील कार्यालयामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ चे आयोजन करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार हे अभियान राबवण्यात येत असून, याद्वारे १०० टक्के प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

प्रशासन होणार अधिक गतिमान आणि लोकाभिमुख
या अभियानाचा मुख्य उद्देश प्रशासकीय कामात गतिमानता आणणे हा आहे. डिजिटल ७/१२ आणि ८अ उताऱ्यांच्या वितरणासाठी ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ प्रणालीचा प्रभावी वापर या शिबिरात केला जाणार आहे. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या थेट नियंत्रणाखाली हे अभियान राबवले जाईल.

मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक
वरोरा तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये शिबिरे आयोजित केली आहे. यात ७ मार्च २०२६ ला खांबाडा व टेमुर्डा मंडळ, १४ मार्च २०२६ ला चिनोरा व वरोरा मंडळ, १० एप्रिल २०२६ ला माढेळी व चिकणी मंडळ, १७ एप्रिल २०२६ ला साखरा (राजा) आणि शेगाव (बु.) मंडळांचा समावेश आहे.

एकाच छताखाली मिळणार ‘या’ सेवा
या शिबिरांमध्ये नागरिकांना महसूलविषयक विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. यामध्ये प्रलंबित फेरफार निकाल, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल ७/१२ व ८अ वितरण यासह लोकसेवा हक्कांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रे मिळवण्याची सुविधा ‘सिंगल विंडो’ प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सर्व कामांचा अहवाल ‘सनियंत्रण व अहवाल डॅशबोर्ड’वर अद्ययावत केला जाणार असल्याने कामात पूर्ण पारदर्शकता राहणार आहे.

error: Content is protected !!