मॅरेथॉनने अवघे शहर झाले शिवमय !
सार्वजनिक छत्रपती महोत्सव २०२६
मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
उत्साही वातावरणात उत्स्फूर्त सहभाग
चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सार्वजनिक छत्रपती महोत्सव समिती, चंद्रपूरच्या वतीने आयोजित ‘छत्रपती महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. महोत्सवाचे आकर्षण ठरलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत बुधवारी हजारो युवक-युवतींनी धाव घेत संपूर्ण चंद्रपूर शहर शिवरायांच्या जयघोषाने दणाणून सोडले.
मॅरेथॉनला मिळालेला प्रतिसाद
बुधवारी सकाळी ६ वाजता या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. यामध्ये केवळ युवकच नव्हे, तर शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हातामध्ये भगवे ध्वज आणि मुखात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा देत धावणाऱ्या स्पर्धकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
आज पालखी मिरवणूक
गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत गांधी चौक–जटपुरा गेट–गांधी चौक असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटनांचे देखावे सादर करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सव समितीचे निमंत्रक संतोष कुचनकार यांनी केले आहे.
मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुधाकर अडबाले, महोत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, निमंत्रक संतोष कुचनकार, दिलीप वावरे यांच्यासह नगरसेवक प्रदीप देशमुख, सुरेंद्र अडबाले, अजय बलकी, प्राचार्य नरेंद्र बोबडे आणि श्यामकांत थेरे अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाचा उद्देश
शिवजयंती हा केवळ एक सण नसून तो एक लोकउत्सव बनावा, या हेतूने शहरातील सर्वधर्मीय आणि सर्वजातीय संस्थांच्या सहकार्याने १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान गांधी चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या असून, बुधवारी मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्याचा आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
यशासाठी परिश्रम
या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी दीपक जेऊरकर, सुरज अडपेवार, रोशन बुजाडे, विजय बोरकर, हरीश ससनकर, महेश काहिलकर यांच्यासह आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. या मॅरेथॉनमुळे चंद्रपूरच्या वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असून, आता सर्वांचे लक्ष पुढील दोन दिवसांतील मुख्य सोहळ्याकडे लागले आहे.


